लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : ऐन फेब्रुवारी महिन्यातच गावातील कुपनलिका आणि सार्वजनिक विहिरींना कोरड पडल्याने हमदापूर येथील ग्रामस्थांना शेतातील विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. येथील नागरिक बैलगाडीच्या सहाय्याने ड्रम-ड्रम पाणी शेतातील विहिरीवरून आणत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. मार्च व एप्रिल महिन्यात येथे जलसंकट रौद्ररुप धारण करण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने ग्रा.पं. प्रशासनाने तात्काळ योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.हमदापूर येथील रहिवाशांना सध्या जल समस्येचा सामना करावा लागत आहे. २० ते ३० फुट खोलीवर खोदकामादरम्यान हमदापूर येथे पाणी लागत असे. आता मात्र भुगर्भातील जलपातळी ६५ फुटावर गेल्याचे तेथील रहिवासी सांगतात. यामुळे गावातील बहूतांश विहिरी तळ दाखवत असून काही विहिरींना कोरड पडली आहे. भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन या भागात शासकीय नियमांना फाटा देत बोअर केली जात आहे.इतकेच नव्हे तर काही बोअर करणाऱ्यांकडून सध्या नागरिकांच्या अडचणीचा फायदाच घेतल्या जात असल्याचे दिसून येते. विहिरीला कोरड पडल्याने काहींना शेतातील विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. ज्यांची बोअर करण्याची आर्थिक स्थिती नाही अशांना तीन ते चार किमी अंतरावरून बैलगाडीवर मोठाले ड्रम लादून त्याद्वारे शेतातील विहिरींवरून पाणी आणावे लागत आहे. हमदापूर येथील सुधाकर ढोणे त्यापैकी एक आहेत. ऐन फेबु्रवारीत ही परिस्थिती असून मार्च आणि एप्रिल मध्ये ही परिस्थिती विदारक रुप धारण करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गावातील सार्वजनिक विहिरीला कोरड पडल्याने शेतातील विहिरीचा आधार घ्यावा लागत आहे. बैलगाडीवर ड्रम लादून त्याद्वारे पाणी आणावे लागत आहे.- सुधाकर ढोणे, रहिवासी, हमदापूर.
शेतातील विहिरीवरून आणावे लागते पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 11:56 PM
ऐन फेब्रुवारी महिन्यातच गावातील कुपनलिका आणि सार्वजनिक विहिरींना कोरड पडल्याने हमदापूर येथील ग्रामस्थांना शेतातील विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. येथील नागरिक बैलगाडीच्या सहाय्याने ड्रम-ड्रम पाणी शेतातील विहिरीवरून आणत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
ठळक मुद्देजलसंकटाच्या झळा : सार्वजनिक विहिरीला पडली कोरड