नागरिकांची भटकंती : प्रशासनाने उपाययोजना आखण्याची मागणी आर्वी : तालुक्यातील खुबगाव येथील गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात नळयोजनेचा पाणी पुरवठा आहे. परंतु तोही सातत्याने बंद राहत आहे. या तीव्र पाणी टंचाई संदर्भात गावकऱ्यांत प्रचंड रोष आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून यावर अद्याप तोडगा निघाला नाही. १५०० लोकवस्तीच्या गावात नळयोजनेचा वॉर्ड क्रं. ३ मध्ये पाणी पुरवठा गत दोन वर्षांपासून सुरळीत झाला नाही. सध्या उन्हाळा तीव्र झाला असून यातच खुबगाव येथे पाणी टंचाईने गावकरी त्रस्त आहे. गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी नळयोजनेसाठी मोटारपंप बसविले; परंतु पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही. याबाबत गावकऱ्यांनी ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे वारंवार लेखी तक्रारी केल्या; परंतु याची दखल घेतल्या गेली नाही. गावात चार विहिरी आहेत; परंतु या विहिरीचे अद्यापही खोलीकरण करण्यात आले नाही. ग्रामपंचायतीला आम्ही नियमित पाणी पट्टी टॅक्स भरुनही नळयोजनेचा फायदा होत नाही, खुबगाव गावातील डॉ. प्रल्हाद फेदेवार यांच्याकडील पाणीपुरवठा २०१२ पासून सतत बंद आहे. ही तीव्र पाणी टंचाईची समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी रामेश्वर राऊत, ज्ञानेश्वर चौधरी, शरद कुटे, सचिन माहोरे, प्रदीप राऊत, डॉ. प्रल्हाद फेदेवार यांनी निवेदनातून केली आहे.(तालुका प्रतिनिधी)
खुबगावात पाणी प्रश्न बिकट
By admin | Published: April 05, 2017 12:34 AM