लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात दिवसेंदिवस जलसंकट गडद होत असून त्याच्या झळा सर्वांनाच सहन कराव्या लागत आहे. सध्या सिंदी (मेघे) परिसरातील मातोश्री वृद्धाश्रमातही मागील आठ दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट असल्याने वृद्धांची पाण्यासाठी फरपट सुरू आहे. ग्रामपंचायतीकडे पाण्याची मागणी केली पण, ग्रामपंचायतीने नकारघंटा चालविल्याने शेवटी दानदात्यांकडे हात पसरावे लागत आहेत.भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती सरकारच्या काळात १९९७ मध्ये सिंदी (मेघे) परिसरातील मातृसेवा संघाच्या तीन एकर जागेवर मातोश्री वृद्धाश्रमाची इमारत उभारण्यात आली. वृद्धाश्रमाच्या निर्मितीपासून अडीच वर्षांपर्यंतच शासनाकडून अनुदान मिळाले. त्यानंतर बंद झालेले अनुदान अद्यापही मिळत नसल्याने देणगीदात्यांच्या भरोशावर आणि वृद्धांकडून मिळणाऱ्या रकमेतून वृद्धाश्रमाचा डोलारा सावरण्याचा प्रयत्न सुरू आहे. हल्ली येथे १८ महिला व १३ पुरुष असे एकूण ३३ वृद्ध आश्रयाला आहेत. आतापर्यंत वृद्धाश्रमातील विहिरीत पाणी असल्याने कधीही पाणीटंचाई जाणवली नाही. मात्र यावर्षी विहिरीचा गाळ उपसूनही पाणी नसल्यामुळे मागील आठ दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. व्यवस्थापनाने ग्रामपंचायतीकडे पाण्याची मागणी केली. दिवस-रात्र येरझारा केल्या, पण पाणी मिळाले नाही. अखेर वृद्धांना जवळच्याच हातपंपावरून पाणी आणावे लागत आहे.मागील आठ दिवसांपासून पाण्यासाठी हा संघर्ष सुरु आहे. त्यामुळे या वृध्दाश्रमात पाणी पुरवठ्याकरिता मदतीचा हात पुढे करण्याची गरज व्यक्त होत आहे.माणुसकीला फुटला पाझरवृद्धाश्रमातील नागरिकांची ही अवस्था पाहून व्यवस्थापनाने दानदात्यांकडे पाण्याची मागणी केली. त्यामुळे लगेच अनिल परियाल यांनी पाण्याचा टँकर पाठवून त्यांना भोजनदानही दिले. या पाण्याने वृद्धाश्रमातील दोन हजार लिटरच्या दोन मोठ्या टाक्या भरून ठेवल्या आहेत. एक दिवसाआड पुन्हा पाण्याची गरज असल्याने आता कोण टँकर देणार? याचा विचार वृद्ध करीत आहेत. वृद्धाश्रमालगतचा फलके आणि तिळले परिवार नियमित या वृद्धांना पिण्याचे पाणी पुरवित असल्याने त्यांची तहान भागत आहे.मुलं गारव्यात अन् जन्मदाते उकाड्यातया वृद्धाश्रमात नागपूर जिल्ह्यातील दोन व्यक्ती वगळल्या तर उर्वरित वर्धा जिल्ह्यातीलच रहिवासी आहे. काहींची मुले गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीवरून टुमदार बंगल्यात गार हवा घेत आहे. विशेषत: अनेकांची घरेही याच वृद्ध मायबापांनी उभी करुन दिली. पण, त्यांना उकाड्यात दिवस काढणाºया जन्मदात्यांची कदर येत नाही. एक वृद्ध आजारी असून व्यवस्थापनाने मुलांना कळविले. पण, मुलांचे पाऊल अद्याप वृद्धाश्रमात वडिलांकडे वळले नाही.वृद्धाश्रमात सध्या ३३ वृद्ध सदस्य असून मातृसेवा संघाद्वारे त्यांची शुश्रुशा केली जात आहे. वृद्धांकडून मिळणारी महिनेवारी राशी आणि दानदात्यांकडून मिळणारी मदत याच्या भरवशावरच सेवाकार्य सुरुआहे. मागील आठ दिवसांपासून विहिरी आटल्यामुळे पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीकडे मागणी केली पण, पाणी मिळाले नाही. परियाल यांनी एक टँकर पाणी दिले. आता पुन्हा पाण्याची गरज आहे.-सुरेश परसोडकर, व्यवस्थापक.
‘मातोश्री’वर पाण्याचा ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 8:22 PM
शहरात दिवसेंदिवस जलसंकट गडद होत असून त्याच्या झळा सर्वांनाच सहन कराव्या लागत आहे. सध्या सिंदी (मेघे) परिसरातील मातोश्री वृद्धाश्रमातही मागील आठ दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट असल्याने वृद्धांची पाण्यासाठी फरपट सुरू आहे. ग्रामपंचायतीकडे पाण्याची मागणी केली पण, ग्रामपंचायतीने नकारघंटा चालविल्याने शेवटी दानदात्यांकडे हात पसरावे लागत आहेत.
ठळक मुद्देवृद्धांची आबाळ : आठ दिवसांपासून सुरू आहे फरफट