निर्णयाविनाच परतले अधिकारी : म्हणे ! बोरची जागा खासगी समुद्रपूर : गत आठवड्यापासून पारोधी येथील महिला व नागरिक पाणीटंचाईने त्रस्त आहे. दोन दिवस तहसील कार्यालयावर मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात आले. यानंतर तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी पारोधीला भेट देत बोरच्या जागेची शहानिशा केली. सदर जागा बाबाराव धुटे यांच्या मालकीची असल्याचा निर्वाळा देत ते निर्णय न घेताच परतले. परिणामी, पाणीटंचाईला विशेष महत्त्व न दिल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत. २५ वर्षांपूर्वी सदर जागेवर शासकीय खर्चातून बोर झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. १९८५-२००० दरम्यान या बोरद्वारे घरोघरी नळ जोडण्या दिल्या. त्यावेळी ग्रा.पं. मध्ये बाबाराव थुटे गटाची सत्ता होती. बोरची जागा खासगी होती तर शासनाने तेथे बोर करून निधीची उधळण का केली, हा प्रश्नच आहे. या बोरमुळे पाण्याची समस्या निकाली निघत असल्याने शासकीय अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी राजकारण, मतभेद बाजूला सारून निर्णय घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता ग्रा.पं. मधून सदर जागेचा रेकॉर्ड गायब झाल्याचे उपसरपंच महादेव बादले यांनी सांगितले.(तालुका प्रतिनिधी) मी १९९७-९८ मध्ये आमदार असताना पारोधी येथे रस्ता व बोरवेलचे काम केले. स्वत: पारोधी व धुमणखेडा गावातील भिषण पाणीटंचाई पाहून दोन्ही गावात बोरवेल दिल्या. त्यावेळी बाबाराव थुटे यांची जागा नसून गावठाणाची आहे, असे सांगितले होते. खासगी जागा असती तर शासनाचा पैसा आमदार या नात्याने उधळलाच नसता. - अशोक शिंदे, माजी आमदार, हिंगणघाट
पाण्यासाठी पारोधीच्या महिला संतप्त
By admin | Published: March 09, 2017 12:53 AM