जीवन प्राधिकरणचे दुर्लक्ष : प्रवेशद्वाराचा पत्ताच नाहीसेवाग्राम : वरूड रेल्वे ग्रामपंचायत अंतर्गत आणि मुख्य मार्गावरील पेट्रोल पंपाच्या मागे पिपरी (मेघे) अधिक अकरा गावे या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा जलकुंभ आहे. या जलकुंभाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली आहे. कुंपणाच्या तारा तुटलेल्या असून गेट बेपत्ता ओह. शिवाय पायऱ्यांना कुलूप नसल्याचे दिसून आले. याकडे जीवन प्राधिकरणचे दुर्लक्ष होत असल्याचेच दिसते.वर्धा शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागरी व ग्रामीण योजना विभागाचे मुख्य कार्यालय आहे. या अंतर्गत अकरा गावांना शुद्ध पाणी पुरवठा केला जातो. यासाठी जलकुंभाची व्यवस्था करण्यात आली आहे. वरूड गावाचा विस्तार नव्या ले-आऊटमुळे होत आहे. यातून ग्रा.पं. ला आर्थिक उत्पन्न मिळण्याचा स्त्रोत निर्माण झाला आहे. नव्या वसाहती निर्माण झाल्या असल्या तरी सर्वात प्राथमिक गरज पाण्याची आहे. ही गरज लक्षात घेऊन सधन व नव्या ले-आऊटमध्ये उंच भागावर ४ लाख ५० हजार लिटरचा जलकुंभ तयार करण्यात आला आहे. यातून नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे. सदर जलकुंभाला सुरक्षेसाठी तारांचे कुंपण केले. वर जाण्यासाठी पायऱ्या असून कुणी जाऊ नये म्हणून जिन्याला गेट होते; पण सध्या जलकुंभ असुरक्षित असल्याचे दिसते. कुंपणाच्या तारा तुटल्या असून प्रवेशद्वाराचा खांब वाकला. प्रवेशद्वाराचा पत्ताच नाही. जिन्याच्या गेटला कुलूप नसल्याचे दिसून आले. हजारो लोकांना पाणी देणाऱ्या जलकुंभाच्या सुरक्षिततेकडे सध्या दुर्लक्षच होत असल्याचे दिसते. उपविभागीय कार्यालयाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)
जलकुंभाची सुरक्षा धोक्यात
By admin | Published: April 14, 2017 2:20 AM