वर्धा : वर्धा शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. पुढील तीन दिवस पाणीपुरवठा खंडित राहणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन नगर पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
पवनार येथील धाम नदीपात्रावरील जलशुद्धिकरण केंद्रातून येणारी आणि वर्धा शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी आरती चौक परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास फुटली. सोमवारी सकाळपासूनच जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर सुरू होते. दरम्यान, शहराचा पाणीपुरवठा पुढील तीन दिवस ठप्प राहणार असल्याची माहिती नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
रात्रीच्या सुमारास जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर पाण्याचे लोट पसरले होते. लाखो लिटर पाणी वाया गेले. सकाळच्या सुमारास जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पालिकेकडून केले जात होते. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
अर्ध्याअधिक शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद
मुख्य जलवाहिनी फुटल्याने साधारणतः सात ते आठ हजार नळजोडणीधारकांना फटका बसणार आहे. यामुळे गांधीनगर, सुदामपुरी, यशवंत कॉलनी, पुलफैल, तारफैल, महादेवपुरा, आनंदनगर, सिव्हील लाईन, मुख्य मार्केटचा काही भाग, इतवारा परिसर, लक्ष्मीनगर, स्नेहलनगर, सेवाग्राम रोड परिसर तसेच नागपूर रोड परिसरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
पवनार येथून शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. पुढील तीन दिवस शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नसल्याने नागरिकांनी पाण्याची बचत करावी. ६० वर्षे जुनी ही जलवाहिनी असून त्याचे सुटे भाग उपलब्ध होत नाही. त्यामुळे दुरुस्तीला वेळ लागतो. लवकरात लवकर दुरुस्ती केली जाईल.
नीलेश नंदनवार, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, नगरपालिका वर्धा