सारेच निवडणुकीत व्यस्त : थकीत रकमेसाठी पाणीपुरवठा बंदची चर्चाआष्टी (शहीद) : नगरपंचायतची निवडणूक लागली आहे. सारेच त्यात व्यस्त आहेत. यात गावात गत तीन दिवसांपासून नागरिकांना पाणी मिळाले नाही, याची कुणाला खंतही नसल्याचे दिसून आले आहे. २० हजार लोकसंख्या असलेल्या या शहरातील नागरिकांचे पाण्याअभावी हाल होत आहे. येथील पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा ठप्प असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुरूस्तीकरिता केवळ दहा मिनिटांचा कालावधी लागत असून नगर पंचायत प्रशासन दुरुस्तीकरिता टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. शहरात शनिवारी कसाबसा पाणीपुरवठा झाला. त्याचदिवशी ममदापूर गावाजवळ लोखंडी पाईप गंजल्यामुळे फुटला. त्याला वेल्डींग करण्यासाठी अवघ्या दहा मिनीटांचा अवधी पाहिजे; मात्र यासाठी प्रशासकाच्या मंजुरीची आवश्यकता आहे. पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न पाहून प्रशासक तहसीलदार सीमा गजभिये यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. तरी देखील दुरुस्तीकडे डोळेझाक केल्या जात आहे. सध्या जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून नगरपंचायतीला पाणीपुरवठा सुरू आहे. त्याच्या करापोटी ३८ लक्ष रुपयांचे देयक थकित असल्यामुळे पाणीपुरवठा बंद केल्याची चर्चा आहे.पाण्याकरिता येथील नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. भर हिवाळ्याच्या दिवसात ही वेळ आली आहे. यामुळे नगर पंचायतीच्या निवडणुकीनंतर नेमकी काय स्थिती येथील नागरिकांवर ओढवेल या बाबत दबक्या आवाजात चर्चा करताना सुरू आहे. नागरिकांच्या वाढत्या समस्यांकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.याप्रकरणी माजी आमदार दादाराव केचे यांनी पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फुटलेल्या भागाची पाहणी केली. पाईपलाईन तात्काळ दुरूस्त करून नागरिकांची होत असलेली गैरसोय टाळण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. माजी सरपंच सौदानसिंग टाँक यांनी प्रशासक गजभिये यांची भेट घेवून पाईपलाईनचे काम दोन तासात दुरुस्त होणे शक्य असून त्याकरिता २० हजारांचा खर्च असल्याचे सांगितले. मात्र प्रशासकांनी दीड लाखाचे ईस्टीमेट बनविले असून दुरुस्तीसाठी सांगतो अशी भूमिका घेतल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. शासनाचे अधिकारी शासनालाच चुणा लावत असल्याचा आरोप टाँक यांनी यावेळी केला. निवडणूक प्रचारामध्ये उमेदवार आश्वासनांची खैरात वाटत आहे; परंतु बंद असलेला पाणीपुरवठ्याचा मुद्दा एकानेही रेटून धरला नाही, हे विशेष. याकडे लक्ष देण्याची गरज वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)
तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प
By admin | Published: October 28, 2015 2:19 AM