वर्धा : प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध असल्यास खरीप हंगाम २०१५-१६ करीता शेतकऱ्यांना तीन पाळ्यांत पाणीपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मागील तीन खरीप हंगामात शेतकऱ्यांना निसर्गाच्या कोपामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. यामुळे शेतकरी आर्थिकदृष्टया कममुवत झाला. सिंचनाची सोय असताना पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतातील पीक वाळले होते. यावर्षी तीन पाळ्यात पाणी देण्याची मागणी करण्यात आली. यावर सिंचन विभागाने बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या या प्रस्तावानुसार नियोजन केले. यात खरीप हंगामाकरिता तीन पाळ्या प्रस्तावित केल्या असून लाभक्षेत्रातील पाऊस, लाभधारकांची पाण्याची मागणी व कालव्याच्या तांत्रिक अडचणी आदी विचारात घेऊन पाणी सोडण्याचे नियोजन असल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. यामुळे सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी त्यानुसार नियोजन केले आहे.खरीप हंगामाकरिता पिकांना पाणी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. या मागणीनुसार केलेल्या नियोजनात सिंचन विभागाने शेतकऱ्यांना या प्रस्तावाबाबत माहिती दिली आहे. कालव्याचे प्रवाही, कालव्यावरील नदी-नाल्यांवरील मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमूना क्रमांक संबंधित शाखा कार्यालयास सादर करावे, असे कळविले आहे. याकरिता लागणारा हा पाणी अर्ज नमूना ७ अ, ७ ब कोरे फॉर्म संबंधित शाखा कार्यालयात विनामूल्य देण्याची मागणी केली होती. खरीप हंगाम १ जुलै १४ नोव्हेंबर या कालावधीत मागणीप्रमाणे तीन पाणी पाळ्या देण्यात येतील. नमुना क्रमांक ७ चे प्राप्त झालेल्या पाणी अर्जदारास अथवा लाभधारकांना त्यांच्याकडील थकबाकीपैकी १/३ व चालू हंगामाची अग्रीम पाणीपट्टी भरावी लागेल. पिकाचे मागणीक्षेत्र २० आरच्या पटीत असावे. मंजूर उपसा सिंचन योजनाधारकांनी पाणी अर्ज मंजूर करुन घेऊनच उपसा सिंचनातील पाण्याचा वापर करावा. मंजूर क्षेत्रास कालव्याचे पाणी घेण्यात येणारी शेतचारी व विहिरीवरील शेतचारी यामध्ये तीन मीटरचे अंतर असले पाहिजे, असे कळविले आहे. पाणीपट्टी न भरणाऱ्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे उर्ध्व वर्धा धरण विभागाच्या कार्यालयावर बंधनकारक राहणार नाही. त्यांचा पाणीपुरवठा केव्हाही बंद करण्यात येईल व थकबाकीवर शासन निर्णयानुसार दरमहा १ टक्का दराने व्याज आकरण्यात येईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.कालव्याचे पाणी शेतात नेण्यासाठी असलेली पाटचरी स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी लाभधारकांची असल्याचे सांगण्यात आले आहे. पाटचरी स्वच्छतेअभावी पाणीपुरवठ्यामध्ये व्यत्यय आल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. तसेच लाभधारकांनी मंजूर क्षेत्राचे मर्यादेपर्यंत कालवा व नदी-नाल्याच्या पाण्याचा वापर करावा. लाभधारकाने दिवस व रात्री पाणी घेणे बंधनकारक आहे, असे प्रस्तावात नमुद केले आहे. कालवाप्रवाह क्षेत्रातील विहिरीवरुन औद्योगिक वापरासाठी अथवा पिण्याच्या पाण्यासाठी व इतर सिंचनोतर वापरलेल्या पाण्याची बिगर सिंचन पाणीपट्टी आकारणी याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येईल असेही या प्रस्तावात नमुद केले आहे. शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
खरिपाकरिता तीन पाळ्यात पाणी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2015 2:34 AM