रोहणा (वर्धा) : निम्न वर्धा प्रकल्पाच्या मारडा येथील कालव्यात सायकल धुण्याकरिता गेलेल्या दोन बालकांचा बुडून अंत झाला. ही घटना गुरुवारी रात्री उघड झाली. रितीक अविनाश राऊत (१५) व मयुर विजय पारिसे (१४) रा. मारडा असे बुडून मृत्यू झालेल्या बालकांची नावे असल्याची माहिती आहे.
पोलीस सुत्रांनुसार, मारडा येथील रितीक राऊत व मयुर पारीसे हे दोघे सायकल धुण्यासाठी गावानजीकच्या निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याकडे सायंकाळी गेले होते. सायंकाळचे सात वाजले तरी दोघेही घरी परतले नसल्याने आई-वडिलांनी व गावकºयांनी शोधाशोध केली असता गावालगतच्या निम्न वर्धाच्या कालव्याच्या पुलाजवळ मुलांच्या सायकली व चपला दिसल्या. याची माहिती मनोज ज्ञानेश्वर राऊत यांनी पुलगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच हवालदार सूर्यवंशी व सहकारी घटनास्थळी दाखल झाले.
रात्री कालव्यात गावातील पोहण्यात तरबेज असलेल्यांच्या मदतीने मृतदेह शोधण्यात आला. यात दोन्ही मुलांचे मृतदेह मिळून आला. घटनास्थळाचा पंचनामा करून मृदतदेह पुलगाव येथील शवविच्छेदनगृहात पाढविण्यात आले.
दोन्ही मुले मॉडेल हायस्कूल रोहणाचे विद्यार्थी असून रितीक हा वर्ग नववी तर मयुर हा वर्ग आठवीमध्ये शिकत होता. रखरखत्या उन्हामुळे वर्धा नदी व कालवा कोरडा होता पण पाणी टंचाईची तिव्रता कमी व्हावी म्हणून नुकतेच निम्न वर्धा प्रकल्पातील पाणी वर्धा नदीच्या पात्रात व कालव्यात सोडण्यात आले होते. तपास पुलगावचे ठाणेदार मुरलीधर बुरांडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.