वर्धा : सध्या जिल्ह्यात भर उन्हाळ्यात कधी उन्ह, कधी पाऊस अशी स्थिती सुरू असली तरी पाणीटचाईची झळ बहुतेक गावखेड्यांपासून शहरांपर्यंत पोहोचत आहे. मानवांपेक्षा प्राणी, पक्ष्यांवर हे जलसंकट भीषणपणे घोंघावत आहे. एखाद्या डबक्यात पाणी पिताना असे पक्षी, प्राणी दिसल्यावर हे चित्र प्रकर्षाने जाणवते. जिल्ह्यातील हिरवळ कमी होत आहे. जंगले विरळ होत असून तिथे मानवी वस्ती वाढत अहे. त्यामुळे जंगलाचे राजे असलेले पक्षी, प्राणी यांचे निवारे हरवून अन्नाच्या शोधात अनेक पक्षी, प्राणी गावखेड्यातच नव्हे तर शहरात येत आहे. येथे त्यांना थोडेफार अन्न मिळून जात असले तरी आवश्यक असलेले पाणी मिळणे मात्र दुरापास्त झाले आहे. मोकाट जनावरे, कुत्री यांच्यासह माकडांचा गावांमध्ये तसेच खेड्यांमध्ये ठिय्या दिसतो. सदर जनावरे सध्या सर्वत्र पिण्याचे पाणी शोधत असतात. अनेकवार कुठेही पाणी न मिळाल्याने हातपंप, शासकीय नळ अशा ठिकाणी साचलेल्या डबक्यातील पाण्यात त्यांना आपली तहान भागवावी लागते. चिमणी, कावळे व इतरही पक्ष्यांना केवळ पिण्यासाठीच पाण्याची गरज असते असे नव्हे तर या पक्ष्यांना उन्हाच्या दाहकतेपासून स्वत:ला वाचविण्यासाठी सतत पाण्यात डुंबणे गरजेचे असते. पण शुद्ध पाणीच नसल्याने नाल्यातील पाण्यात डुंबण्याची वेळ पक्ष्यांवर आली आहे.(शहर प्रतिनिधी)
प्राणी-पक्ष्यांवर जलसंकट
By admin | Published: April 18, 2015 1:50 AM