लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : देशभरातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच बदलापूरमध्ये अवघ्या ४ आणि ६ वर्षीय दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. समाजमन सुन्न करणारी ही घटना असून 'तुमचे दीड हजार नकोय, लाडक्या बहिणीला न्याय द्या' या मागणीकरिता शनिवारी इंडिया महाविकास आघाडीच्यावतीने वर्ध्यात आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. यात सहभागी व्हा, असे आवाहन महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेत केले.
कलकत्ता येथील डॉक्टर युवतीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देशाला हारवून सोडले असून या घटनेचे व्रण मनावर कायम असतानाच बदलापुरातील नामांकीत शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आला. एकीकडे सरकार 'बेटी बचाव, बेटी पढाव' अशी घोषणा देत आहे. तर दुसरीकडे शाळेतही मुली असुरक्षित आहे. आरोपींना कठोर शिक्षा करण्याऐवजी त्यांना संरक्षण देण्याचे काम केले जात आहे. या सर्व प्रकाराविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी शनिवारी वर्ध्यातही आक्रोश मोर्चा काढणार असल्याचे जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा सचिव दुर्गा काकडे, शरदचंद्र पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा ज्योती देशमुख, अर्चना भोंमले, डॉ. माधवी पाटील, उबाठाच्या उपसंघटिका भारती कोटंबकर, सीपीआईच्या द्वारका इमडवार, अनुराधा दिलीप उटाणे यांची यांनी सांगितले.