नगर पंचायत व बाजार समितीची डोळेझाक : बाजारातून मिळतोय लाखो रुपयांचा महसूलसुधीर खडसे। लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : शहरातील ऐतिहासिक गुरांच्या व आठवडी बाजाराची सध्या दयनिय स्थिती आहे. चिखलातच बाजार भरत असल्याने ग्राहकांसह व्यापाऱ्यांनाही कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. नगर पंचायत व कृषी उत्पन्न बाजार समिती याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. मोठा महसूल गोळा करूनही सुविधा पुरविल्या जात नसल्याने असंतोष पसरला आहे. १९५१ च्या जनपद सभेपासून समुद्रपूर येथील ऐतिहासिक गुरांचा व आठवडी बाजाराशी तालुक्यातील ३० ते ४० गावांतील नागरिकांची नाळ जुळली आहे. या गावातील पुरूष व महिला बाजारातून धान्य, भाजीपाला, किराणा आठवड्यापुरता खरेदी करतात. शिवाय गुरांची खरेदी-विक्री करण्याकरिताही नागपूर, अमरावती व इतर प्रांतातून व्यापारी येतात. आज या बाजारात गुडघाभर चिखलातून ये-जा करावी लागत आहे. या चिखलात गुरांनाही चालणे कठीण होत आहे. नाईलाज म्हणून ग्राहक व व्यापारी जीव मुठीत घेऊन कसा-बसा बाजार करीत असल्याचे चित्र आहे. थोडासा उंचवटा करून चिखलातच भाजीपाल्याची दुकाने थाटावी लागत आहेत. याबाबत नगर पंचायत प्रशासन मात्र मुग गिळून गप्प असल्याचे दिसते.स्थानिक नगर पंचायतीला या बाजारातून दरवर्षी ४ लाख ९५ हजार रुपयांचे महसुली उत्पन्न मिळते. गुरांच्या बाजाराचे समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला ३ लाखांच्या वर महसुली उत्पन्न मिळते. एवढे मोठे उत्पन्न देणाऱ्या या बाजारातील अनेक समस्या दशकापासून कायम आहेत. या गैरसोयीमुळे दिवसेंदिवस अनेक व्यापारी या बाजाराकडे पाठ फिरवीत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, बाजाराची संख्याही रोडावत आहे. या बाजार परिसरात उच्च प्राथमिक शाळा व संत गजानन महाराज मंदिर आहे. यामुळे चिखलाचा त्रास विद्यार्थी तथा भाविकांनाही सहन करावा लागत आहे. या बाजार परिसरातील दुकानदारांनी आपले साहित्य मुख्य रस्त्यावर थाटले आहे. यामुळे नागरिकांना ये-जा करणेही कठीण झाले आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.
आठवडी तथा बैल बाजार चिखलात
By admin | Published: July 03, 2017 1:44 AM