ऑनलाईन लोकमतवर्धा : पाठीवर ४० किलोचे वजन घेऊन ८ अंश तापमानात चढाई सुरू झाली. थंडी, वादळ यांचा सामना करीत ७ दिवसांच्या चढाईनंतर आम्ही शिखरावर पोहोचलो. तेथे तापमान होते, उणे ४० अंश सेंटीग्रेड! अंगात त्राण नाही. शिवाय ५० किमी वेगाने वाहणारा वारा! अशाही स्थितीत शिखरावर भारताचा तिरंगा हातात घेऊन फोटो काढताना ऊर भरून आला. आजही हा प्रसंग आठविला की अंगावर रोमांच उभे राहतात, हा रोमांचक अनुभव अंटार्क्टीकातील सर्वोच्च शिखर माऊंट विन्सन सर करणारे भारतीय वायूसेनेत भूदल प्रशिक्षक पदावर कार्यरत राकेश काळे यांनी कथन केला.बहार नेचर फाऊंडेशनतर्फे आयोजित अंटार्क्टीका मोहिमेच्या अनुभवकन कार्यक्रमात ते बोलत होते. जवाहर नवोदय विद्यालय वर्धाचे विद्यार्थी राहिलेले राकेश काळे वयाच्या १७ वर्षी भारतीय वायूसेनेत भरती झाले. यानंतर त्यांनी पर्वतारोहणाचा प्राथमिक व उच्च, असे दोन्ही अभ्यासक्रम पूर्ण केले. भारतातील ११ पर्वतारोहण मोहिमेत त्यांनी भाग घेतला. पैकी नऊ शिखरे पादाक्रांत केली. उर्वरित दोनमध्ये विविध अडचणींमुळे अपयश आले. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या त्रिशुल-१ या शिखर मोहिमेत त्यांचा सहकारी मरण पावला. हा आघात विसरत नाही, तोच त्यांना अंटार्क्टीका मोहिमेत निवड झाल्याचे वरिष्ठांनी सांगितले. मरणाची भीती न बाळगता त्यांनी या मोहिमेवर जाण्याचे ठरविले. मृत्यू तर रोड अपघातातही येऊ शकतो, असे त्यांनी मनाला समजाविले व पाच जणांच्या भारतीय वायुसेनेच्या चमूसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या पाच लोकांनी अंटार्क्टीकातील सर्वोच्च शिखर माऊंट विन्सन २५ डिसेंबर २०१७ रोजी सर केले. हा सर्व साहसिक प्रवास राकेश यांनी स्लाईड शो च्या माध्यमातून मांडला. शिखरावर पोहोचलो त्यावेळी ‘आपण जग जिंकले, मैन ने तो जिंदगी जी ली’ अशी भावना झाल्याचेही त्यांनी सांगितले. यापुढील मिशन दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमंजारो राहणार असल्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.प्रहार सामाजिक संस्थेचे प्रा. मोहन गुजरकर यांनी २० हजार फु ट उंच हिमालय पायथा सर केला. त्याची रोमांचक आठवण सांगितली. प्रास्ताविक करीत परिचय बहारचे अध्यक्ष किशोर वानखेडे यांनी दिला. आभार विरखडे यांनी मानले.
पाठीवर ४० हजार किलो वजन अन् उणे ८ अंश तापमान...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 11:31 PM
पाठीवर ४० किलोचे वजन घेऊन ८ अंश तापमानात चढाई सुरू झाली. थंडी, वादळ यांचा सामना करीत ७ दिवसांच्या चढाईनंतर आम्ही शिखरावर पोहोचलो. तेथे तापमान होते, उणे ४० अंश सेंटीग्रेड! अंगात त्राण नाही.
ठळक मुद्देराकेश काळे : बहारचा अनुभवकथन कार्यक्रम