लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : राज्यातील सर्व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर सेवा, कल्याणकारी योजनांकरिता निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. याद्वारे निवृत्तीनंतरची अनेक कामे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना करून घेणे सोईचे होणार आहे. निवृत्ती वेतन, महागाई भत्त्यातील वाढ तसेच शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम करून समाधानी व दीर्घ, आनंदी आयुष्यासाठी मदत करणे हे संघटनेचे उद्दिष्ट आहे. संघटना ही पोलीस अधिकारी, अंमलदार यांना निवृत्तीनंतर मानसन्मान व जनतेत सहभाग मिळवून देणे, पोलीस परेड व इतर शासकीय कार्यक्रम व समारंभात सक्रीय सहभाग, स्थानिक पोलीस ठाण्यात सन्मानाची वागणूक, त्यांचा विविध समितीत सक्रीय समावेश करणे, पोलीस खात्यात मिळणारा सेवा व कल्याणकारी योजनांचा लाभ निवृत्तीनंतर मिळावा, निवृत्त अधिकारी व कर्मचारी तसेच कर्तव्यकाळात शहीद झालेले त्यांच्या कुटुंबांकरिता कल्याणकारी योजना राबविणे व शासनामार्फत सेवा व सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्या कुटंूबियांना, मुलांना नोकरीच्या दृष्टीने मदत करणे, त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, विधवांना तात्काळ निवृत्ती वेतन व इतर लाभ मिळवून देण्यासाठी ही संघटना काम करणार आहे. संघटनेचे राज्य अध्यक्ष निवृत्त पोलीस महासंचालक टी.के. चौधरी आहेत. वर्धा जिल्हाध्यक्ष निवृत्त एसीपी गं.बा. पाटील, उपाध्यक्ष मु. अस. खान, सु.दौ. मेहरे, वैकुंठ उईके, सचिव व्य.सं. बुंदे, रमेश खेडकर, कोषाध्यक्ष अमृत मडावी हे तर सदस्यांमध्ये गंगाधर गेडाम, भोलेनाथ लोणारे, मनोहर तेलंग, कृष्णकांत पांडे यांचा समावेश आहे. मार्गदर्शक हनुमंत ठाकरे, रवींद्र कानफाडे, पांडुरंग बांबल, पुरूषोत्तम गवई, अंगद उईके, संजय देशपांडे, पवनकुमार शुक्ला तर विदर्भ समन्वयक दी.बी. बढीये यांचा समावेश आहे. जिल्हा संघटक म्हणून सुरेश बोरकर काम पाहणार आहेत.
निवृत्त पोलिसांसाठी कल्याणकारी संघटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:53 AM