वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील भिवापूर येथे एका शेळीने एकाच वेळी तब्बल पाच पिलांना जन्म दिला. ही वार्ता गावात पसरताच त्यांना बघण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.
भिवापूर येथील गजानन ठाकरे यांच्या घरी शेळीने पाच पिलांना जन्म दिला. साधारणत: शेळी दोन किंवा तीन पिलांना जन्म देते, असे सांगितले जाते. काही ठिकाणी शेळीने चार पिलांना जन्म दिल्याच्या दुर्मीळ घटनाही घडल्या आहेत. मात्र, तब्बल पाच पिलांना जन्म देण्याची विदर्भातील ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. गजानन ठाकरे यांनी आपल्या व्यवसायाला काही वर्षांपूर्वी शेळी पालनाची जोड दिली आहे. ते ठेका पद्धतीने शेती करतात. शिवाय भाजीपाला विक्री करून ते कुटुंबाचे पालनपोषण करतात.
सध्या त्यांच्याकडे पाच मोठ्या शेळ्या आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी एक शेळी खरेदी केली होती. मागीलवर्षी या शेळीने चार पिलांना जन्म दिला होता. आता गेल्या सोमवारी तब्बल पाच पिलांना जन्म दिला आहे. ही वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने गजानन ठाकरे यांच्या घरी पिले व शेळीला बघण्यासाठी गर्दी होत आहे. ही शेळी मिश्र प्रजातीची असल्याचे सांगण्यात येते. बारबेरी आणि उस्मानाबादी प्रजातीच्या शेळीचे हे क्रॉस ब्रिड असावे, अशी शक्यता वर्तविली जाते. तसेच काहींनी पाच पिलांना जन्म देणारी ही शेळी गावरान असावी, असा अंदाजही व्यक्त केला.