लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या महालसीकरण मोहिमेने नुकताच २.१८ लाखांचा टप्पा ओलांडला असून, आरोग्य विभागाच्या प्रभावी नियोजनामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील एकाही लाभार्थ्याला कोविड लसीचा कॉकटेल देण्याची वेळ ओढावली नाही. विशेष म्हणजे, कोरोना लसीचा पहिला डोस वेगळा आणि दुसरा वेगळा घेतला, तरी त्याचा विपरित परिणाम होत नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. लस तुटवड्यामुळे जिल्ह्यात सध्या १८ ते ४४ वयोगटांतील लाभार्थ्यांना कोविडची लस देणे बंद असले, तरी ४५ पेक्षा जास्त वयोगटांतील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन किंवा कोविशिल्ड ही लस दिली जात आहे. गुरुवार २७ मे रोजीपर्यंत जिल्ह्यात २ लाख १८ हजार ९८० व्यक्तींना लसीचा पहिला, तर ५४ हजार ८९८ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. ज्या लाभार्थ्याला कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनचा पहिला डोस दिला, त्याला त्याच लसीचा दुसरा डोस दिला जात आहे. विशेष म्हणजे, इतर जिल्ह्यांत लसीकरण माेहिमेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसला, तरी वर्धा जिल्ह्यातील नागरिकांकडून लसीकरण मोहिमेला स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, पण वर्धा जिल्ह्याची लसकोंडीच सध्या शासनाकडून केली जात आहे. वर्धा जिल्ह्याच्या लसीकरण मोहिमेची गती लक्षात घेता, शासनाने मुबलक लससाठा वर्धा जिल्ह्याला उपलब्ध करून देण्याची गरज आहे. जिल्ह्यात एकूण ११५ लसीकरण केंद्र आहेत. परंतु, लस तुटवड्यामुळे काही मोजक्यात केंद्रांवरून सध्या लाभार्थ्यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे.
लस तुटवड्यामुळे लागला ब्रेकnमागणीच्या तुलनेत अतिशय अल्प लससाठा वर्धा जिल्ह्याला उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटांतील लाभार्थ्यांना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्याच्या उपक्रमाला ब्रेक लागला आहे. मुबलक लससाठा उपलब्ध होताच, सदर वयोगटातील लाभार्थ्यांना कोविडची व्हॅक्सिन देण्यात येईल, असे सांगण्यात आले.
ज्या कोविड व्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला, त्याच लसीचा लाभार्थ्यांनी दुसरा डोस घ्यावा. ते सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचेही आहे. लसीच्या कॉकटेलबद्दल अजूनही शासनाच्या मार्गदर्शक सूचना वर्धा जिल्ह्याला प्राप्त झालेल्या नाही, शिवाय जिल्ह्यात आतापर्यंत कुठल्याही लाभार्थ्याला लसीचा कॉकटेल देण्यात आलेला नाही.- डॉ.प्रभाकर नाईक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.
ज्या व्यक्तीने कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला त्याने दुसराही कोव्हॅक्सिनचाच तर ज्या व्यक्तीने कोविशिल्डचा पहिला डोस घेतला त्याने दुसरा डोस कोविशिल्डचाच घ्यावा. लसीकरणाबाबत सखोल मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यावरच नेमके काय सूचविण्यात आले याची माहिती जिल्ह्यातील आरेाग्य यंत्रणेतील तज्ज्ञांना मिळणार आहे. पण सध्यातरी सुरक्षेच्या दृष्टीने लसीचा कॉकटेल न घेतलेलेच बरे.- डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, मुख्य वैद्यकीय अधीक्षक,आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे).