वर्धा : नागरिकांना पारदर्शक व कालबद्ध सेवा पुरविण्यासाठी तसेच शासकीय कामात गतिमानता व पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘व्हॉट्सॲप ग्रिव्हन्स रेड्रेसल’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत व्हॉट्सॲप तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना कार्यालयात न येता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तक्रार करता येणार असून, तक्रारीचे जिल्हाधिकारी निवारणही करणार आहेत.
या कक्षामध्ये सुरू करण्यात आलेल्या ९१५६७०६१०८ या व्हॉट्सॲप क्रमांकावर विविध विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबत नागरिकांना काही तक्रार असल्यास दाखल करता येणार आहे. ज्या नागरिकांनी पूर्वीच त्यांचे व्यक्तिगत किंवा शासकीय कामासाठी तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर केला आहे. परंतु विहित मुदत उलटूनही त्या अर्जावर कार्यवाहीसंदर्भात माहिती अप्राप्त आहे, अशा अर्जदारांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांशी संबंधित योजना, जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या पंतप्रधान आवास योजना, आदिवासी विभागाच्या बिरसा मुंडा कृषी योजना, जिल्हाधिकारी कार्यालयासंबंधीत शेतकरी शिवार पांदण रस्ता, प्रधानमंत्री पीक विमा योजना, कृषी विभागाच्या सर्व योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, बियाणे, खते, औषधांसंबंधीत तक्रारी, फळबाग लागवड, नाला खोलीकरणाची कामे आदी योजनांबाबत नागरिकांना तक्रार करता येणार आहे.
तक्रार करताना काय करावे?
नागरिकांनी अर्ज सादर करतांना त्यांचे नाव, पत्ता व संपर्क क्रमांक लिहून ज्या कार्यालयाकडे पूर्वी अर्ज केला आहे, त्या कार्यालयाचे नाव, पत्ता, अर्जाचा दिनांक आदी तपशील वाचनीय स्वरूपात नमूद करून अर्जाचा फोटो व्हॉट्सॲप क्रमांकावर सादर करावा. त्यानंतर नागरिकांना त्यांच्या व्हॉट्सॲपवरील संदेशाच्या तीन दिवसांच्या आत त्यांच्या यापूर्वीच्या अर्जाची सद्यस्थिती तसेच केलेल्या व करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबाबत माहिती पुरविली जाणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी दिली.
नागरिकांच्या तक्रारीचा वेळीच निपटारा होऊन त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून ‘व्हॉट्सॲप ग्रिव्हन्स रेड्रेसल’ योजना राबविली जात आहे. या माध्यमातून व्हॉट्सॲप तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली. यामुळे वेळ आणि त्रासही वाचणार असल्याने नागरिकांनी याचा फायदा घ्यावा.
राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी