प्राथमिक शिक्षणाची स्थिती चिंतनीय : जिल्हा परिषद शाळांमध्ये लेटलतीफ शिक्षकांची भरमारराजेश भोजेकर वर्धापूर्वी गुरुजींचा शाळेत दरारा आणि गावात रूबाब असायचा. आता अपवाद वगळता तो दरारा आणि रुबाबही बघायला मिळत नाही. ज्या चांगल्या शाळा आहे त्या आदर्श आहे. लोकमत आणि शिक्षण विभागाने संयुक्तरित्या शनिवारी वायगाव(नि.) येथील शाळांमध्ये केलेल्या स्टींग आॅपरेशनने येथील शाळांची स्थिती पुढे पाठ आणि मागे सपाट असल्याचे हे विदारक वास्तव पुढे झाले. येथील एका शाळेच्या किचनला भेट दिली असता तेथे खिचडी शिजत होती. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी एल.एम. डुरे यांनी खिचडीत आलू कुठे आहे. असे विचारले असता आहे न सर म्हणत खुद्द मुख्याध्यापकच खिचडीत आलू शोधायला लागले. ‘शितावरुन भाताची परीक्षा’ याचा येथे प्रत्यय आला.शाळांच्या नेमक्या स्थितीचा अंदाज घेण्यासाठी स्टिंग आॅपरेशन करण्यात आले. शाळेची निवड वेळेवर करण्याचे ठरले. यासाठी खुद्द जि.प. शिक्षण सभापती वसंतराव आंबटकर यांनी पुढाकार घेतला. सभापती आंबटकर, वायगाव गटाच्या जि.प. सदस्य मिना वाळके, पर्यवेक्षक धनराज तायडे आणि लोकमतचे प्रस्तुत प्रतिनिधी सकाळी ७ वाजता वर्धा तालुक्यातील वायगाव(निपानी) येथील चौरस्ता येथे एकत्र आले. वायगावातीलच जि.प. मुलींच्या शाळेत जाण्याचे ठरले. ७ वाजून ५ मिनिटांनी शाळेला भेट दिली. मुख्याध्यापिका सुनिता सुपारे व सहायक अध्यापिका वैशाली येरेकर यांनी ७ वाजून ३ मिनिटांनी शाळा उघडल्याचे समजले. प्रार्थनेला सुरुवात झाली तेव्हा पटावरील १०३ पैकी केवळ २२ विद्यार्थीच हजर होते. त्यानंतर शिपाई किरण घुमे या ७ वाजून १० मिनिटांनी हजर झाल्या. सहायक अध्यापिका मिनाक्षी मस्के ७ वाजून ३० मिनिटांनी शाळेत दाखल झाल्या. छाया ठाकरे व सिंधू मनोहरे या शिक्षिका अर्ज न देताच गैरहजर असल्याचे मुख्याध्यापिकेने सांगितले. काहीवेळाने म्हणजेच ८ वाजता त्यातील छाया ठाकरे हजर झाल्या. मागील वर्षी या शाळेत १३४ ही पटसंख्या होती. या शाळेवर मुख्याध्यारिकेचेही नियंत्रण नसल्याचे यावेळी लक्षात आले. प्रार्थनेत राष्ट्रगीत, प्रतिज्ञा आणि राष्ट्रवंदना झाली. या गोष्टी विद्यार्थ्यांना मूखपाठ होत्या; मात्र त्याबद्दल काहीएक माहिती विद्यार्थ्यांना नव्हती. सभापती आंबटकर यांनी या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्याच्या सूचना केल्या तेव्हा शिक्षिकांचीही भंबेरी उडाली. शाळा परिसरात स्वच्छतेचा अभाव दिसून आला. स्वच्छतागृहाचे काम अर्धवटस्थितीत आहे. शाळेची नवीन इमारत उभी झाली; मात्र छत गळते. किचन शेडमध्येही स्वच्छतेचा अभाव जाणवला.यानंतर चमूने आपला मोर्चा वायगावातीलत दुसऱ्या जि.प. शाळेकडे वळविला. शाळा परिसरात एकही झाड लावलेले दिसले नाही. इमारत पुरातन वास्तूसारखी असल्याचे लक्षात आले. स्वच्छतेचा बोजवारा होता. शाळेच्या आवारात उभे राहिल्यानंतर शैक्षणिक वातावरणाचा अभाव जाणवला. येथे बदली होऊन रूजू झालेल्या एका शिक्षकाने माहितीपर फलक भिंतीवर रंगवले आहे. याशिवाय या शाळेच्या भिंती मुक्याच असल्याचे निदर्शनास आले. त्या शिक्षकाने वर्गणीतून प्रिंटर विकत घेतल्याचे यावेळी सांगितले. एका वर्गातील मुले लॅपटॉपवर शैक्षणिक गीते ऐकत होती. महत्त्वाची बाब म्हणजे, ते विद्यार्थी लॅपटॉप हाताळताना दिसले.यानंतर ही चमू येथील यशवंत विद्यालयात दाखल झाली. तेथे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डुरे आधीच अचानक धडकले होते. त्यांनी शाळा परिसराची पाहणी केली. यामध्ये त्यांना ४० टक्के विद्यार्थी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. शिक्षण सभापती आंबटकर यांनी विद्यार्थ्यांच्या भेटी घेतल्या. प्रयोगशाळेत भिंतीवर टांगलेल्या मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या छायाचित्राकडे बघून सभापतींनी हे कोण, असे तेथील एका शिक्षिकेला विचारले असता सी.व्ही. रमन असे सांगण्यात आले. यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांसह चमू पुन्हा किचनमध्ये गेली. तेथे खिचडी शिजत होती. खिचडीचा दर्जा शिक्षणाधिकाऱ्यांना खटकला. त्यांनी ही खिचडी विद्यार्थी कसे खाणार याबाबत सवाल केला. तसेच ही खिचडी पाणी न पिता खावून बघा आणि नंतर विद्यार्थ्यांना देण्याच्या सूचना केल्या. खिचडीत एकही आलू दिसत नसल्याची बाब शिक्षणाधिकारी डुरे यांच्या लक्षात आली. लगेच मुख्याध्यापक प्रदीप मेघे हे आहे न सर म्हणत स्वत: हातात चमच घेऊन त्या खिचडीतील ‘आलू’ शोधायला लागले. खिचडी तयार करणाऱ्या एका महिलेने आधीच प्लेटमध्ये काढून ठेवलेला आलूचा एक तुकडा दाखविला. एकच आलू टाकला का, असा सवालही उपस्थितांनी करताच शाळा व्यवस्थापनाची भंबेरी उडाली. वडद जि.प. शाळेच्या आवारात बऱ्यापैकी वृक्षारोपण केलेले आढळले. आवारभिंतीमुळे शाळेचा परिसर सुरक्षित होता. इयत्ता तिसरीपेक्षा पहिलीचे विद्यार्थी अधिक प्रगत दिसले. वास्तविक, दोन्ही वर्गाला एकच शिक्षक शिकवितात. चवथीतील विद्यार्थ्यांना वाचता येत होते. येथे शिक्षकांची विद्यार्थ्यांप्रती आपुलकीची भावना दिसून आली. एकूणच शाळांची स्थिती शिक्षकांसह शिक्षण विभागाला चिंतन करायला लावणारी आहे,आलूचा शोध अन् हशा...खिचडीत आलू नाही हे शिक्षणाधिकाऱ्यांचे शब्द ऐकताच मुख्याध्यापक यांनी खिचडीत आलूचा शोध घेणे सुरू केले. चम्मच खोलवर जावून बाहेर आल्यानंतरही त्यात आलू मात्र आला नाही. तरीही त्यांनी आलू आहे न सर म्हणताच स्वयंपाकी महिलेले प्लेटमध्ये काढून ठेवलेला आलू दाखवून हे बघा सर आलू टाकलेले आहे, असे म्हणाली. तेव्हा एकच हशा पिकला.
मुख्याध्यापक खिचडीत आलू शोधतात तेव्हा...
By admin | Published: September 18, 2016 12:46 AM