लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वायफड येथील एका शिक्षण संस्थेतील संचालक तथा जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्याने शिक्षकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये 'पोर्न व्हिडीओ' पोस्ट केले. दरम्यान, ग्रुपमधील शिक्षिका आणि इतर सदस्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. संतप्त शिक्षिकांनी थेट पोलिस अधीक्षक, पोलिस निरीक्षक तसेच शिक्षणमंत्र्यांकडेच तक्रार पाठवून त्या संचलकाविरूद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा, भारतीय न्याय संहिता २०२३, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ कायदा व इतर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
वायफड येथील एका शिक्षण संस्थेच्या वतीने विविध शाळा महाविद्यालये चालविली जातात. संस्थेंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये २७२ सदस्य आहेत. ग्रुपमध्ये अनेकदा सूचना आणि दिशानिर्देश पाठविले जातात. या ग्रुपमध्ये शिक्षण संस्थेचा संचालकही आहे. त्याने त्या ग्रुपमध्ये अश्लिल व आक्षेपार्ह पॉर्न व्हिडीओ प्रसारित केले. तसेच ग्रुपमध्ये मद्यपान करणाऱ्या लोकांचे फोटो आणि व्हिडीओदेखील फॉरवर्ड करत असून, मद्यपानाला प्रोत्साहन देत आहे. संचालकांकडून कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ करणे सुरू असल्याचे तक्रारीत नमूद आहे. याची तक्रार सायबर पोलिसांकडे प्राप्त झाली असून सध्या हे प्रकरण चौकशीत ठेवण्यात आल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले.
"यासंदर्भात माझ्यासमोर अद्यापपर्यंत हे प्रकरण आलेले नाही. तरी मी प्रकरणाची चौकशी करुन तुम्हाला माहिती देतो." - पराग पोटे, पोलिस निरीक्षक, वर्धा शहर