लोकमत न्यूज नेटवर्कतारासावंगा : लॉकडाऊनमध्ये सातत्याने शाळा बंद असून कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता शाळा सुरू करण्याबाबत शासनाने कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही शाळा सुरू होण्याच्या हालचाली दिसून येत नाही. स्थानिक पातळीवर पालक व शिक्षकांमध्ये मतांतरे व्यक्त होत, शाळा सुरू करण्याबाबत संभ्रमावस्थेत आहेत. या सर्व घडामोडींमध्ये मात्र पालकांचा गट शाळा सुरू करण्याच्या बाजूने उभा आहे.ग्रामीण पातळीवर ज्या भागात कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका नाही किंवा रुग्णांची संख्या नगण्य आहे. अशा ठिकाणी शाळा सुरू करता येऊ शकतात. परंतु त्यासाठी स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याची स्थिती बघत योग्य पाठपुरावा करणे गरजेचे आहे. कारण ग्रामीण भागात १ ते ८ वी पर्यंत ऑनलाइन शिक्षण प्रणाली ही ५० टक्के अयशस्वी ठरते. ऑनलाइन शिक्षण प्रणालीमध्ये बरेच अडथळे येत आहे. नवीन शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिकवणीचा पर्याय पुढे आला. त्यातून विद्यार्थ्यांचा ऑनलाइन शिकवणी वर्ग दररोज सुरू आहे. ऑनलाइन क्लासेस, ऑनलाइन प्रश्नमंजुषा, सराव चाचण्या असे उपक्रम ऑनलाइन शिक्षणात सुरू आहेत. ऑनलाइन शिक्षणामध्ये काही तांत्रिक तर काही परिस्थितीमुळे अडचणी येत आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांजवळ अँड्रॉइड मोबाइल उपलब्ध नसल्याने, त्यांच्या शिक्षणात खोळंबा निर्माण झाला आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण मोठे अडसर ठरत असल्याचे पालक व विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. पेरणीच्या हंगामात शाळा सुरू होणार नसल्याने, विद्यार्थ्यांना शेतीच्या रस्त्याची धुरा पकडावी लागत आहे. चिमुकले ही वडिलांसोबत शेतीकामात बालवयातच राबतांनी ग्रामीण भागात दिसून येत आहे. त्यामुळे शिक्षक आणि पालक त्यांच्यात शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीनुसार आपसात समन्वय साधून शाळा सुरू करण्याबाबत ग्रामीण भागात पालक आता आग्रही होत आहेत. त्यामुळे पालक आणि पाल्यांना शाळेचे वेध लागल्याचे दिसून येते.
शाळा सुरू करण्याबाबत शासनाकडून अजूनपर्यंत कुठलेही निर्देश आलेले नाही. ग्रामीण भागात बऱ्याच विद्यार्थ्यांकडे मोबाइल नाही, मोबाइल आहेत तर महिन्याचा रिचार्ज पालकांना करून देणे शक्य होत नाही. आणि रिचार्ज केलास तर नेटवर्क नसते. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यावर उपाय म्हणून आम्ही सर्व शिक्षकांनी स्वखर्चातून स्वाध्याय पुस्तिका विकत आणून विद्यार्थ्यांकडून सोडवून घेत त्यांना मार्गदर्शन नियमित करीत आहोत. यात तारासावंगा शाळेतील शिक्षक रॉय, सोनटक्के, सावरकर व पोहेकर आदी मोलाचे काम करीत आहे.- प्रकाश परतेती, मुख्याध्यापक, जि.प. उच्च प्राथमिक शाळा, तारासावंगा.
मला पालक वर्ग येऊन भेटतात तारासावंगा येथे एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. त्यामुळे अजून किती दिवस शाळा सुरू होणार नाही, असे विचारतात. पण शासनाकडून शाळा सुरू करण्याबाबत कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम कायम आहे.- लिलाधर खोडे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, तारासावंगा.