लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन विविध प्रलंबित मागण्यांकरिता कृती समितीच्या नेतृत्वात गुरुवारी अचानक राज्यभर संप पुकारला. या संपाचा धसका घेऊन शासनाने तातडीने महागाई भत्ता व घरभाडे भत्ता मंजूर केला. त्यामुळे कृती समितीने आंदोलन मागे घेतले; परंतु कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी दुर्लक्षित राहल्याने कर्मचाऱ्यांनी संघटनांना रामराम करून आपला संप सुरूच ठेवला. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांमध्ये लालपरी ठप्प झाली आहे.दिवाळी असतानाच राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या सहा दिवसांपासून संप पुकारल्याने प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे. जिल्ह्यातील पाच आगारांपैकी वर्धा आगार हा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने मोठा आगार आहे. या आगारातून सर्वत्र बसफेऱ्या सोडल्या जातात. पण, सहा दिवसांपासून या आगारातून एकही बस गेली नसल्याने प्रवाशांची मोठी कोंडी झाली आहे. तळेगाव आगारातील सर्व बसेस सुरू असून इतर आगारांतून मोजक्याच बसफेऱ्या धावत आहे. या संपामुळे नियमित प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी आणि नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने खिशावर भार पडत आहे. त्यामुळे आगारातील बसेस धावणार कधी? असा प्रश्न विचारला जात आहे.
दिवाळीच्या खरेदीसाठी जाणेही महागलेnदिवाळीचा महत्त्वाचा सण असल्याने ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात मुला-बाळांसह खरेदीसाठी शहरात येतात. पण, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून बसेस बंद असल्याने गावखेड्यात बस दिसलीच नाही. परिणामी नागरिकांना ऑटो किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्याच संपाचा फायदा खासगी वाहतूक करणाऱ्यांनी उचलला असून आधीच महागाई त्यात खासगी वाहनाला मोजावे लागणारे पैसे, यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी जाणेही महाग झाले आहे.
पासधारकांना पाहिजेत वाढीव मुदत- जिल्ह्यात नियमित प्रवास करणाऱ्या नोकरदार व कामगारांची संख्या मोठी आहे. त्याकरिता ते मासिक पास काढतात. पण, संपामुळे या पासधारकांची चांगलीच अडचण झाली आहे. त्यामुळे आता गेल्या सहा दिवसांपासून बसचा प्रवास बंद असल्याने पासची मुदत वाढवून देण्याची मागणी होत आहे.
सणासुदीच्या काळात संप नकोत
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करावेच लागणार. त्याकरिता आमचेही समर्थन आहे. जे सहजासहजी मिळत नाही ते आंदोलनाच्या माध्यमातूनच मिळवावे लागतात. परंतु सणाच्या दिवसांमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या बरीच असते. त्यामुळे प्रवाशांचीही गैरसोय होऊ नये म्हणून सणांच्या दिवसात तरी संप नसावा.-सुदेश ताकसांडे, प्रवासी
दिवाळी हा मोठा सण असतो. त्यामुळे शिक्षण व नोकरीकरिता बाहेरगावी असणारे आपापल्या गावी परतात बरेचजण एस. टी. महामंडळाच्या बसमधून प्रवास करतात; पण, आता दिवाळीच्या दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे. शासनाने त्यांच्या मागण्यांची पूर्तता करून प्रवाशांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे. - शशिकांत पाटील,विद्यार्थी
जिल्ह्यात पाच आगारांपैकी तळेगाव (श्याम.पंत) येथील आगारातील सर्व बसेस सुरू आहेत तर वर्धा आगारातील सर्व बसेस बंद असून एकही बस बाहेर पडली नाहीत. यासोबतच इतर आगारांतील जवळपास २५ टक्के बसेस सुरू आहेत. दिवाळीच्या दिवसात या संपामुळे प्रवाशांना मोठा त्रास होत आहे तसेच राज्य परिवहन महामंडळालाही मोठा फटका बसत आहे. - चेतन हसबनीस , विभागीय नियंत्रक