राजेश सोळंकीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आधी कोरोना संकट व नंतर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, यामुळे लोकवाहिनी अशी ओळख असलेल्या रापमच्या बसेस आगारात उभ्या राहिल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. तर आता न्यायालयाच्या अल्टिमेटमनंतर रापमचे कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले आहेत. परिणामी, ९६६ फेऱ्या सुरू झाल्या असल्या तरी अजूनही जिल्ह्यातील तब्बल ११४ बस फेऱ्या सुरू न झाल्याने त्या केव्हा सुरू होणार, असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.रापम कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. तर रापमलाही मोठा आर्थिक फटका बसला. बसेस आगारातच उभ्या राहिल्याने खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी दुप्पट-तिप्पट भाडे नागरिकांकडून घेत प्रवासी वाहतूक केली. पाच महिन्यांपासून विलीनीकरणाचा लढा सुरू असतानाच न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचा अल्टिमेटम आंदोलनकर्त्यांना दिला. न्यायालयाच्या आवाहनाला प्रतिसाद देत १२४४ कर्मचारी कर्तव्यावर रुजूही झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही बसेस सोडल्या जात आहेत. जिल्ह्यातील पाच आगारांमधून सध्या ९६६ फेऱ्यांद्वारे ७२ हजार किमीचा प्रवास बसेस करीत असल्या तरी अजूनही १४४ फेऱ्या सुरू झालेल्या नाहीत. त्या वेळीच सुरू करण्याची गरज आहे. तशी मागणीही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची आहे.
शैक्षणिक फेऱ्या बंदच- आदिवासी भागातील मुलींना शैक्षणिक सोयी-सवलतीसाठी राज्यात मानव विकासच्या निळ्या बसेस आहेत.- वर्धा जिल्ह्याच्या शेजारील अमरावती आणि नागपूर विभागात या बसेस असून, वर्धा विभागातील पाचही आगारांत मानव विकासच्या या बसेस नाहीत. - वर्धा जिल्ह्यात रापमच्या वतीने विद्यार्थ्यांची बाजू लक्षात घेता, काही बसेस सोडल्या जातात. असे असले तरी जिल्ह्यातील विविध शाळांनाही सुटी लागल्याने या बसफेऱ्या बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
प्रवाशांची गैरसोय
पाच महिन्यांनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला. त्यामुळे सर्व ठिकाणी बसेस धावत आहेत. मात्र, अनेक गावात बसेस जात नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होते. ग्रामीण भागासाठीही बसेस सोडण्यात याव्यात.- मनीष उभाड, ग्रामस्थ, लाडेगाव.
सुरुवातीला कोविड, तर नंतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे बस गावात येत नव्हती. त्यामुळे खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागला. खासगी प्रवासी वाहतूक करणारे जास्तच प्रवासी भाडे घेतात. नागरिकांची समस्या लक्षात घेऊन ग्रामीण भागातही बसेस सोडल्या पाहिजेत.- गौरव ठाकरे, ग्रामस्थ, हिवरा.
आर्वी आगारात ४३ बसेस असून, पूर्ण शेडुल्ड व फेऱ्या सुरू आहे. १६ हजार कि.मी. या बसेस धावतात. विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटी असल्याने त्या फेऱ्या गर्दीच्या ठिकाणी दुसरीकडे वळविण्यात आल्या आहेत. लग्नसराईचे दिवस असल्याने उत्पन्नातही भर पडली आहे. सध्या सव्वा सहा लाखांचे दररोजचे उत्पन्न आहे.- जयकुमार इंगोले, आगार व्यवस्थापक.