लोकमत न्यूज नेटवर्करोहणा: येथून ३ किमी. अंतरावर असलेल्या बोथली (पांजरा) येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळा गेल्या पाच वर्षांपासून बंद आहे. दोन मजली सुसज्ज इमारत शासनाने बांधून कोट्यावधी रुपये खर्च केले. मात्र याचा उपयोग होत नसल्याने शासनाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत ही शाळा सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
विदर्भ पर्यावरण व पर्यावरण संस्थेच्या वतीने या इमारतीत आदिवासी विद्यार्थ्यांकरिता सीबीएसई शाळा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्या संदर्भात प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या पत्राप्रमाणे स्वतंत्र आदिवासी मुलींची आश्रम शाळा बोथली येथे सुरू करण्याबाबत अपर आयुक्त आदिवासी विकास नागपूर यांच्या कार्यालयाद्वारे पत्र ८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रस्तावित करण्यात आले होते. शासनाने ही शाळा येत्या शैक्षणिक क्षेत्रात सुरू करावी अशी मागणी विदर्भ पर्यटन व पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब गलाट यांनी केली आहे.
या शाळेसंदर्भात आर्वीत एका कार्यक्रमात खासदार अमर काळे यांच्याकडे हा प्रश्न मांडण्यात आला. तेव्हा स्थानिक लोकप्रतिनिधींनी हा आदिवासी मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी बोथली (पांजरा) सालदरा, गौरखेडा इत्यादी गावातील आदिवासी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.