लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : खरीप हंगामात महाराष्ट्रात पूर परिस्थिती, तसेच सततच्या पावसाने कापसाची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे कापसाच्या भावातही तेजी आली असून, कापूस लवकरच १० हजारांवर पोहोचणार असल्याचा अंदाज जाणकार व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्रात कापसाचे झालेले कमी उत्पादन व अचानक वाढलेल्या मागणीने कापसाच्या भावात तेजी आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला प्रचंड मागणी असली, तरी त्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने खासगी व्यापारातच शेतकऱ्याच्या कापसाला भाव देण्यावरून स्पर्धा सुरू असल्याचे बाजारात दिसून येत आहे. सध्या ९ हजारांच्या आसपास कापसाचे भाव पोहोचले असल्याने, येत्या काही दिवसांत कापसाच्या भावात तेजी पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी वाढल्याने कापसाच्या भावात तेजी आली आहे. येत्या काही दिवसांत कापसाच्या भावात तेजी येऊन त्याचा भाव १० हजारांच्या घरात जाण्याची शक्यता व्यापारी वर्गात व्यक्त करण्यात येत आहे.
व्यापारी स्पर्धा शेतकऱ्यांच्या फायद्याची- कापसासोबत कापूस खरेदी करणाऱ्या फॅक्ट्रऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खरेदीत चांगलीच स्पर्धा आली. ही स्पर्धा शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरली. ज्या फॅक्ट्ररीत भावात तेजी, तसेच तेथील भाव शेतकऱ्यांना योग्य वाटला, तेथे त्याची आवक वाढली. त्यामुळे विविध फॅक्ट्ररीत कापसाची आवक वाढली. शेतमालाला तेजीचा भाव मिळू लागला.
पांढरे सोने ठरले बाजारपेठेसाठी देवदूत
- पुलगाव : कापूस एकाधिकार योजना अंमलात येऊन जवळपास ४० वर्षांचा काळ लोटला आहे. अशा परिस्थितीत २०२१ वर्ष शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्यासाठी ऐतिहासिक ठरले. तरुणपणापासून म्हातारपण येईपर्यंत जो भाव शेतकऱ्यांनी पाहिला नव्हता, तो या वर्षी सुरुवातीच्या काळातच कापसाला मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. - मागील काही वर्षांपासून सोयाबीन हे शेतकऱ्यांसाठी दिवाळी साजरी करण्याचे पीक म्हणून ओळखले जायचे. या पिकामुळे शेतकऱ्यांची काही प्रमाणात आर्थिक अडचण दूर होऊन देवाण-घेवाणीचे व्यवहार चालत होते. त्यामुळे सोयाबीन काही प्रमाणात विकून शेतकरी आपल्या गरजा भागवून कापूस साठवून ठेवत होते, परंतु या वर्षी पहिल्यांदाच कापसाच्या भावाने मोठी मुसंडी मारल्यानंतर शेतकऱ्यांनी काही कापूस विकून दिवाळी साजरी केली. मिळालेल्या भावामुळे बाजारपेठेत आनंदाचे वातावरण आहे.- आजच्या ऑनलाइनच्या युगात शहरी भागातून मोठ्या प्रमाणात ऑनलाइन खरेदी केले जाते. त्यामुळे त्याचा परिणाम बाजारपेठेतही दिसला व सणासुदीला दिसणारी गर्दी गायब झाली होती. दिवाळीत मोठ्या प्रमाणात खरेदी झाली ती ग्रामीण भागातील नागरिकांकडून त्यामुळे बाजारपेठेत सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. लहान सोबत मोठे व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. पांढरे सोने बाजारपेठेसाठी देवदूत ठरल्याचे दिसून आले.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी वाढली आहे. त्या तुलनेत उत्पादन मात्र, कमी असल्याने कापसाच्या भावात यंदा तेजी आली आहे. कापसाचे हे दर पाहता पुढील काळात हे दर आणखी वाढण्याची शक्यता बाजारपेठेत आहे. -विनोद कोटेवार, सचिव, बाजार समिती, आर्वी.