लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मंगळवार २० नोव्हेंबरला सकाळी केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या परिसरात कालबाह्य झालेले बॉम्ब निकामी करताना झालेल्या दुदैवी स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला. तर १८ जण जखमी झाले. या घटनेला तीन दिवसांचा कालावधी लोटला असला तरी अद्यापही परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर सदर घटनेच्या अनुषंगाने जबाबदारी निश्चित करून कुणावरही अद्याप कारवाई न झाल्याने कासवगतीने या घटनेची चौकशी सुरू असल्याचे बोलले जात आहे.सोनेगाव (आबाजी), केळापूर, चिकणी, जामणी या चारही गावांचे नागरीक न्याय मागण्यासाठी टाहो फोडत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. चिकणी, जामणी, केळापूर, सोनेगाव (आबाजी) या चार गावाच्या मध्य भागी केंद्रीय दारूगोळा भांडारच्या परिसरात जमीन भरड असल्यामुळे या परिसरात कालबाह्य बॉम्ब निकामी करण्यात येतात. मागील ५० वर्षांपासून हा जीवघेणा प्रकार केल्या जात आहे. ज्या वेळी बॉम्ब फुटतात आणि जोरदार आवाज होतो त्यावेळी अनेकांची झोपच उडते. शिवाय या आवाजाचा सर्वाधिक त्रास वयोवृद्धांना सहन करावा लागतो.बॉम्बच्या स्फोटाच्या हादऱ्यामुळे अनेकांच्या घराच्या भिंतींना यापूर्वी तडा गेल्या आहेत. मागील ५० वर्षांपासून सुरू असलेल्या हा प्रकार एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारा असल्याने बॉम्ब निकामी करण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याची गरज असताना साध्या सुरक्षा उपकरणांचा वापर न करता कालबाह्य बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरू होते हे २० नोव्हेंबरच्या घटनेने पुढे आणून दिले आहे. परंतु, कारवाईची जबाबदारी असलेले प्रशासन घटनेच्या तीन दिवसानंतरही ढिम्मच असल्याचे दिसून येत आहे.
सोनेगाव येथे बॉम्ब स्फोट झाल्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी मृतकांच्या कुटुंबियांना तसेच ग्रामस्थांनी आपली व्यथा त्यांच्याकडे मांडली. शिवाय केंद्रीय दारूगोळा भांडारातील अधिकारी व कंत्राटदार यांच्यात साटेलोटे असल्याचे सांगितले. शिक्षणाचे वय असलेल्या तरुणांकडून कंत्राटदार धोकादायक कामे करून घेतो. त्यामुळे गावातील तरुणांमधील शिक्षणाची गोडी हरवत चालली आहे. या दुदैवी घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.- सतीश दानी, राज्याध्यक्ष शेतकरी संघटना, युवा आघाडी.सुमारे २० वर्षांपूर्वी आपण नागरिकांची समस्या संबंधितांकडे मांडली होती. परंतु, कुठल्याही अधिकाºयांनी दाद दिली नाही. मिलिटरी प्रशासनाने जामणी व केळापूर येथील शेतकºयांना भाडेतत्त्वावर जमीन दिली होती; पण दोन वर्षांपूर्वी त्यांच्याकडून ती काढून घेण्यात आली. दारूगोळा भांडारात काम मिळत असल्याने बहूदा वार्षीय शेतमजूर मिळत नाही. वास्तविक पाहता दारूगोळा भांडारातील काम हे जीवावर उदार होऊनच करावे लागते. बॉम्ब निकामी करण्याच्या दिवसांमध्ये जीव मुठीत घेऊन काही जण पीतळ, तांबे, लोखंड आदी गोळा करण्यासाठी जातात. सदर प्रकार आता तरी थांबला पाहिजे.- शेख बाबा, शेतकरी चिकणी (जामणी)केळापूर हे गाव केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या परिसरापासून जवळच आहे. तेथे बॉम्ब निकामी होत असताना आम्हाला दहशतीचा सामना करावा लागतो. इतकेच नव्हे तर बॉम्बच्या हादºयामुळे घरांना तडे जातात. शिवाय श्वनाच्या आजारांनाही पुढे जावे लागत आहे. कंत्राटदार विविध आमिष देऊन परिसरातील गावातील नागरिकांना कामावर नेतात. अनेकांचे दुदैवी घटनेत प्राणही गेले आहे. तर काहींना अपंगत्व आले आहे. गेल्या वर्षी पासून पडिक जमिनीवर तार कुंपन करण्यात आल्याने गुरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय अनेकांना जनावरे विकावी लागली आहे.- बंडु भोयर, शेतकरी केळापूर.केंद्रीय दारूगोळा भांडारातील बॉम्ब निकामी करण्याच्या प्रक्रियेचा नाहक त्रास या भागातील शेतकºयांना व ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. धातू शोधन्याच्या नादात यापूर्वी काहींचे प्राण गेले आहेत. तर बॉम्बच्या हादºयामुळे घरांनाही तडे जातात. आम्हाला दहशतीतच जगावे लागत आहे. म्हणून निकामी करण्यात येणारे बॉम्ब आमच्यासाठी घातकच ठरत आहेत.- प्रकाश राऊत, शेतकरी, जामणी.