लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने वाहतुकीच्या नियमांची प्रभावी जनजागृती करण्यासह बेशिस्त वाहनचालकांवर धडक कारवाई केली जात आहे. असे असले, तरी काही तरुण धोकादायक पद्धतीने वाहने चालवित असल्याचे बघावयास मिळते. इतकेच नव्हे, तर फटाके फोडणारे सायलेन्सर वाहनाला बसविणे हे कायद्यान्वये गुन्हा ठरतो, पण अनेक वाहनांना असे सायलेन्सर असल्याचे वास्तव असून, त्यामुळे ध्वनिप्रदूषणात भर पडत आहे. असे असतानाही मागील १३ महिन्यांत वाहतूक नियंत्रण शाखेकडून एकही फटाके फोडणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे फटाके फोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यास रोखले कुणी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.कर्णकर्कश हॉर्न, फटाके फोडणारे सायलेन्सर, चारचाकी वाहनांच्या काचांना काळी फिल्म लावणे, दुचाकी, तसेच चारचाकी वाहनांना फॅन्सी नंबर प्लेट बसविणे हे मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा ठरतो. या नियमाला बगल देणाऱ्यांवर वाहतूक, तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जाते, परंतु जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा शहरासह जिल्ह्यातील देवळी, हिंगणघाट, पुलगाव, सेलू आदी मोठ्या शहरात वाहतूक नियमांना सर्रास बगल दिली जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. कर्णकर्कश हॉर्न, तसेच फटाके फोडणारे सायलेन्सरमुळे ध्वनिप्रदूषणात भर पडत असली, तरी मागील १३ महिन्यांच्या काळात फटाके फोडणाऱ्या एकाही वाहनावर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कारवाई करण्यात आलेली नाही, तर म्युझिकल हॉर्न असलेल्या सुमारे १५ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे.
या कलमान्वये होतेय कारवाईकर्णकर्कश, तसेच म्युझिकल हॉर्न असलेल्या वाहनावर मोटर वाहन कायद्याच्या कलम ११९/१७७ अन्वये कारवाई केली जाते.फटाके फोडणारे सायलेन्सर बसविण्यात आलेल्या वाहनांवर मोटर वाहन कायद्याच्या कलम १२०/१७७ अन्वये कारवाई केली जाते.एखादी व्यक्ती त्याच्या ताब्यातील वाहन धोकादायक पद्धतीने चालवित असल्यास, त्या व्यक्तीवर कलम १८४ अन्वये कारवाई केली जाते.
रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासह बेशिस्तांवर धडक कारवाई केली जात आहे. धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्यांवर प्राधान्यक्रमाने कारवाई करा, अशा सूचना आपण आपल्या सहकाऱ्यांना दिल्या आहेच.- राजेश कडू, पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा.