लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मिनीमंत्रालयाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापतींचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर मिळलेली मुदत वाढ. त्यानंतर निश्चित झालेली निवडणुकीची तारीख, त्यातही वेळोवेळी झालेला बदल. हा सर्व गोंंधळ संपल्यानंतर निवडणुकीची वेळ काही तासांवर आली आहे. काही दिवसांपासूनच भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. भाजपाने निवडणुकीपूर्वी सर्व सदस्यांना एकत्र करुन ताडोबावारी काढली आहे. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या निवडणुकीत अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जिल्हा परिषदमध्ये ५२ सदस्य संख्या असून त्यात भाजपाचे ३१, काँग्रेसचे १३, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व बहुजन समाज पार्टी या तिन्ही पक्षाचे प्रत्येकी २ तर रिपाई व अपक्षांचे प्रत्येकी एक सदस्य आहे. सभागृहात भाजपाचे बहूमत असल्याने प्रारंभी अध्यक्षासह उपाध्यक्ष आणि सर्व सभापतीपद हे भाजपच्याच वाट्याला आले. विशेषत: प्रारंभी भाजपाला रिपाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठींबा दिला होता. मात्र आता राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी व सेना एका बाजुने आले आहे.त्यामुळे आता भाजपा विरोधकांकडे संख्याबळ वाढले आहे. त्यामुळे दगाफटका होऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टीच्यावतीने पंचायत समितीची निवडणूक होताच भाजपाच्या सर्व सदस्यांना एकत्र करुन ताडोबावारी काढली. सध्या भाजपासह रिपाईचे सदस्य ताडोब्याला गेले आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा यांनी वर्ध्यात एकत्र येत रविवारी दिवसभर मोर्चेबांधणी केली. विरोधकही शांत बसले नसून त्यांच्याकडून भाजपातील असंतृष्ठांचा ठाव घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे सोमवारी सभागृहात काय घडामोडी घडतात याकडे लक्ष आहे.इच्छुकांची गर्दी, कुणाला देणार संधीजिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आता नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेकरिता राखीव असल्याने काहींचा हिरमोड झाला. भाजपकडे सभागृहात आवश्यक संख्याबळ असल्याने अनेकांनी अध्यक्षपदाकरिता फिल्डींग लावली आहे. भाजपकडे चारही मतदारसंघात अध्यक्षपदाकरिता दावेदार महिलांची संख्या आहेत. त्यामुळे आता अध्यक्षपद कुणाला द्यावे, असा मोठा पेच पक्षाच्या नेत्यांना पडला आहे.आर्वी मतदारसंघात अध्यक्षपद जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, आता देवळी आणि वर्धा मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित झाल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये देवळी मतदार संघातील तीन तर वर्धा मतदारसंघातील एका महिला सदस्याचे नाव चर्चेत आहे. यामध्ये दोन विद्यमान सभापती तर दोन सदस्य आहेत.पण, विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींना पुन्हा संधी देऊ नये, नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात यावी, अशीची चर्चा पुढे आल्याने अध्यक्षपद नेमके कुणाकडे जाते, हे निवडणुकीनंतरच कळणार आहे. महिला अध्यक्ष असल्याने उपाध्यक्षपद हे पुरुषाकडे द्यावे, असाही आग्रह सुरू असल्याचे बोलले जात आहे.असा आहे निवडणूक कार्यक्रमजिल्हा परिषदेच्या सभागृहात सकाळी ११ ते १.३० वाजतादरम्यान ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. निवडणुकीच्या कामासाठी अध्यासी अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी ११ ते १ वाजता दरम्यान नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येईल. दुपारी १ वाजतापासून सभेला सुरुवात करून नामनिर्देशनपत्राची छाननी करण्यात येईल. दुपारी १.१५ ते १.३० वाजता अर्ज मागे घेण्यात येईल. आवश्यकता पडल्यास दुपारी १.३० वाजतानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.ताडोब्यात संगीतखुर्ची अन् अंताक्षरीहीभारतीय जनता पार्टीचे ३१ सदस्य असताना भाजपाच्या दोन सदस्यांनी ताडोबावारीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे भाजपचे २९ सदस्यांना घेऊन दोन दिवसाची ताडोबा सहल काढली आहे. या सहलीमध्ये जिल्हा परिषदेचे विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारीही सहभागी आहे. यातील सर्व महिला व पुरुष मंडळींनी मनोरंजन संगीतखुर्ची व अंताक्षरी स्पर्धा घेतली. महिला सदस्यांच्या संगीत खुर्चीचा खेळ पुढे चालविण्याकरिता चक्क आमदारांनी थाळी वाजवून प्रोत्साहन दिले. मात्र, राजकीय खेळीत कोण यशस्वी होईल, हे निवडणुकीअंतीच कळणार आहे.
कोण होणार अध्यक्ष?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 6:00 AM
जिल्हा परिषदमध्ये ५२ सदस्य संख्या असून त्यात भाजपाचे ३१, काँग्रेसचे १३, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व बहुजन समाज पार्टी या तिन्ही पक्षाचे प्रत्येकी २ तर रिपाई व अपक्षांचे प्रत्येकी एक सदस्य आहे. सभागृहात भाजपाचे बहूमत असल्याने प्रारंभी अध्यक्षासह उपाध्यक्ष आणि सर्व सभापतीपद हे भाजपच्याच वाट्याला आले. विशेषत: प्रारंभी भाजपाला रिपाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठींबा दिला होता.
ठळक मुद्देउत्सुकता शिगेला : मिनिमंत्रालयाचा रणसंग्राम; घडामोडींना वेग