लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तू माझ्याकडे कां बघितलेस...गाडी आडवी का लावलीस...रागाने माझ्याकडे का बघतोस...आमच्या अंगणात तुझी गाडी का लावलीस...कचरा का टाकला.. खर्रा का दिला नाही...दारू पिण्यास पैस का देत नाही...अशा क्षुल्लक कारणांवरून हाणामारी, चाकू हल्ले होत आहे. अगदी जीवघेण्या हल्ल्यांपर्यंत तरुणाईची मजल गेली आहे. त्यामुळे ‘राग क्षणाचा अन् घात जिंदगीचा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात १७ खुनाच्या घटना, तर १९ जीवघेणे हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. व्यसनाधीनतेमुळे तरुणाई आक्रमक होत चालल्याचे दिसून येत आहे. शहरासह जिल्ह्यात काही वर्षांपासून किरकोळ कारणांवरून एकमेकांवर हल्ले करण्याच्या घटना घडत आहेत. याकडे प्रशासन व नागरिकांनी वेळीच लक्ष दिले नाही, तर भविष्यात हे हल्ले खूप मोठी डोकेदुखी ठरू शकते, अशी भीती तज्ज्ञमंडळींकडून व्यक्त केली जात आहे. सामाजिकदृष्ट्या ही गंभीर बाब असल्याचे बोलल्या जात आहे.
काही दिवसांपूर्वी पुलगाव शहरात दारूसाठी पैसे न दिल्याने युवकास रॉडने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. तसेच देवळी शहरात खर्रा खाण्यावरून झालेल्या वादातून मारहाण करण्यात आली. माझ्या घरासमोर कचरा का टाकला. या कारणातून तिघांनी एका महिलेस मारहाण केल्याची घटना आर्वी तालुक्यातील एका गावात घडली. दोन दिवसांपूर्वी शहरातील शास्त्री चौकात वडापाव देण्यास उशीर झाल्याने विक्रेत्याच्या छातीत कैची खूपसून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी शहरातील चितोडा परिसरात क्षुल्लक कारणातून एका १९ वर्षीय युवकाला दोघांनी खून केला. जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे रोज एखाद्या घटनेची नोंद पोलीस ठाण्यांत होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सामाजिक स्वास्थ बिघडत चालले असल्याचे चित्र आहे.
हल्ल्याच्या केंद्रस्थानी ‘व्यसनाधिनता’
बहुतांशवेळा हल्ल्यांमध्ये संशयित नशेत असल्याचे आढळून येते आहे. जिल्ह्यात दारू, गुटखा, खर्रा, चरस, गांजा आदी विविध अमली पदार्थ सहज उपलब्ध होत आहे. क्षुल्लक कारणातून होणाऱ्या हल्ल्यात व्यसनाधिनता केंद्रस्थानी असल्याचे मत काही मानसोपचारतज्ज्ञांनीदेखील व्यक्त केले आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही विशेष कारवाई करण्याची गरज आहे. अनेक अशा प्रकरणांचा उलगडादेखील पोलिसांनी केला आहे. मात्र, काही विकृतांकडून आणि व्यसनाधिनांकडून असे हल्ले अजूनही सुरूच असल्याने पोलिसांचादेखील ताण वाढला आहे.
जिवलग मित्र, आई-वडिलांवरही प्राणघातक हल्ले
आजमितीस किरकोळ कारणातून झालेले मतभेद पुढे टोकाच्या निर्णयापर्यंत जात आहेत. किरकोळ कारणातून जिवलग मित्र एकमेकांचे शत्रू बनत आहे. मित्रानेच मित्रावर खुनी हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. खर्चासाठी पैसे दिले नाहीत, दारूसाठी पैसे दिले नाहीत, याचा मनात राग धरून चक्क आई-वडिलांवरही मुलांनी हल्ले केल्याच्या घटना घडत आहेत. रागाच्या भरात पुढे कोण आहे याच जराही विचार न करता हल्ले होत असल्याचे दिसून येत आहे.
संशोधनाची आज गरज
क्षुल्लक कारणावरून हाणामारीपासून ते अगदी प्राणघातक असे हल्ले होत आहेत. ‘अति राग आणि भीक माग’ अशी अवस्था अनेक वेळा हल्लेखोरांवर आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेकांना असंख्य प्रश्नांना सामोरे जावे लागले आहे. किरकोळ कारणावरून वाढत चाललेले हल्ले हा आज संशोधनाचा विषय बनला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.