लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले असून, सध्या उन्हाळवाहीची कामे पूर्ण केली जात आहेत. खरीप हंगामात ४ लाख ३७ हजार हेक्टरवर विविध पिकांची पेरणी होणार असून, सोयाबीनसाठी एक लाख ४२ हजार क्विंटल तर इतर पिकासाठी ९ हजार ८५१ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता भासणार आहे.मोठ्या प्रमाणात बियाण्यांची गरज भासणार असली तरी यंदाच्या उन्हाळी हंगामात जिल्ह्यात तब्बल ७०३.४ हेक्टर जमिनीवर उन्हाळी सोयाबीनची लागवड झाली होती, तर सध्या सोयाबीन उत्पादक सोयाबीन मळणीच्या कामाला गती देत आहेत. जिल्ह्यात उत्पादित होणारे हेच सोयाबीन खरिपात सोयाबीनची लागवड करणाऱ्यांना दिलासा देणारे ठरणार आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून बियाण्यांच्या दरात दिवसेंदिवस वाढ आहे, तर यंदा डिझेल दरवाढीमुळे बियाण्यांच्या किमतीवरही त्याचा परिणाम पडल्याचे काही कृषी व्यावसायिक सांगतात. त्यामुळेच वाढत्या महागाईत महागडे बियाणे घेण्यापेक्षा घरातील सोयाबीन शेतकऱ्यांना मालामाल करण्याची शक्यता असून, शेतीवरील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी घरचेच बियाणे शेतकऱ्यांनी वापरावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
७०३.४ हेक्टरवर उन्हाळी पेरासिंचनाची सोय असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी सोयाबीन लागवडीला पसंती दर्शविली. ७०३.४ हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनचा पेरा झाला असून, सध्या सोयाबीन मळणीच्या कामाला शेतकरी गती देत आहेत.
९० हजार मेट्रिक टन खताची लागणार गरजजिल्ह्याला ९० हजार मेट्रिक टन खताची आवश्यकता असून, मागणी प्रमाणे बियाणे व खते उपलब्ध होणार आहे. खतांचा ४ हजार ६७० मेट्रिक टन इतका बफर स्टॉक करण्यात आला आहे. शिवाय खरीप हंगामात बांधावर खते व बियाणे या योजनेंतर्गत ४ हजार ३०० शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर खते व बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
घरच्या घरी करा बीज प्रक्रियाशेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये या उद्देशाने मागील वर्षी तसेच यंदाही जिल्ह्यात विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अवघ्या काही तासांच्या प्रशिक्षणाअंति शेतकऱ्यांना घरच्या घरीच बीज प्रक्रिया करून बियाण्याची गुणवत्ता तपासता येते. त्यामुळे फसवणूक टळते.
१ हजार १७० कोटी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टयंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार १७० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. मागेल त्याला पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष रणनिती तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
गौडबंगाल करणाऱ्यांवर होणार कारवाई
खरीप हंगामात बोगस बियाणे विकल्या जाण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाच्या वतीने विशेष भरारी पथके तयार करण्यात आली आहे. त्यात जिल्हास्तरीय एक तर तालुका स्तरावर प्रत्येकी एक पथकाचा समावेश आहे. बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई केली जाणार आहे.
शेतकऱ्यांनी शेतीवरील उत्पादन खर्च करू करण्याच्या उद्देशाने घरातीलच सोयाबीनचा बियाणे म्हणून वापर करावा. गुणवत्ता तपासण्यासाठी सुरुवातीला बीज प्रक्रिया करावी. जिल्ह्यात बियाणे व खताचा तुटवडा निर्माण होणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा