एसटीचा प्रवास करमणूकीचा हमखास : प्रवासी वाढवा अभियानमहेश सायखेडे। लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या विविध योजना राबवून राज्य परिवहन महामंडळ कात टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना सुविधेसाठी नवीन योजना हाती घेतल्या आहे. यात प्रवाशांना प्रवासादरम्यान मोफत वायफाय सेवा देण्याकरिता वर्धेतील एकूण ३१३ गाड्यांत वायफाय लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे काम मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. हे बॉक्स लागल्यानंतर परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास मनोरंजनात्मक होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील वर्धा, पुलगाव, आर्वी, हिंगणघाट व तळेगाव या रापमच्या पाच डेपोतून लांब पल्ल्याच्या एकूण ३१३ बसेस आहेत. या बसमधून प्रवासादरम्यान कुठलेही मनोरंजनाचे साधन राहत नाही. प्रवाशांना चांगल्या सोई-सुविधा द्याव्या या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन ‘एसटीचा प्रवास करमणूक हमखास’ या नावाने रापमने नवीन योजना कार्यान्वीत केली आहे. बसने प्रवास करणाऱ्या प्रत्येक स्मार्ट फोन धारक प्रवाशाला यातून मोफत वायफाय मिळणार आहे. वायफाय बॉक्स असलेल्या बसमध्ये स्मार्टफोन धारक प्रवाशाला प्रवासादरम्यान आपला फोन रापमच्या केवी नामक वायफायशी कनेक्ट करून मनोरंजनात्मक असणारे मराठी व हिंदी कार्यक्रम तसेच चित्रपट आदी बघता येते. रापमच्या प्रवासी सेवेकडे नागरिकांचा कल वाढावा या उद्देशानेच ही योजना सुरू करण्यात आली. याची माहिती देण्याकरिता बसच्या प्रत्येक खिडकीच्यावर या योजनेची माहिती प्रवाशांना व्हावी म्हणुन फलक लावण्यात आले आहेत. सदर स्टिकर कुणी फाडल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशा सुचनाही नमुद आहेत.लांब व मध्यम पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्यजिल्ह्यातील पाच डेपोच्या बसेसमध्ये वायफाय बॉक्स लावण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सर्वप्रथम लांब व मध्यम पल्ल्याच्या तसेच एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रत्येक डेपोत बसच्या उपलब्धतेप्रमाणे वायफाय बॉक्स लावले जात आहे. असा घेता येतो लाभएसटीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशाने प्रवासादरम्यान आपल्या स्मार्ट फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन वायफाय वर क्लिक करावे, त्यानंतर केवी निवड करून सेटींगमधून बाहेर येत क्रोम, सफारी हे नेट ब्राऊजर उघडून त्यात व्हीओओटी डॉट कॉम टाईप करून एन्टर केल्यानंतर त्याला मराठी व हिंदी चित्रपटांसह विविध मनोरंजनात्मक मालिकांचा आनंद लुटता येतो.बसस्थानकावर प्रचार-प्रसाररापमच्यावतीने प्रवाशांना मोफत वायफाय सेवा पुरविली जात आहे. त्यामुळे ऐरवी बसचा कंटाळवाणा होणारा प्रवास आता मनोरंजनात्मक होणार आहे. परिवहन विभागातर्फे देण्यात येणाऱ्या या सेवेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा तसेच रापमच्या प्रवासाला नागरिकांनी प्राधान्यक्रम द्यावा यासाठी मोठ्या बस स्थानकावर प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे.भंगार बसेसकडे लक्ष देण्याचीही मागणी ही योजना राबवितानाच जिल्ह्यातील रस्त्यांवर धावणाऱ्या भंगार बसगाड्या दुरूस्त करण्याची मागणी जोर धरत आहे. या भंगार बसगाड्यांतून होणारा प्रवास आणि आता देण्यात येणार असलेली वायफाय सुविधा याचा मेळ बसत नसल्याची ओरड प्रवाशांकडून करण्यात आली आहे.जिल्ह्यातील काही बसेसमध्ये वायफाय बॉक्स लावण्यात आले असून मे महिन्याच्या शेवटपर्यंत जिल्ह्यातील संपूर्ण बसेसमध्ये सदर बॉक्स लावण्याचे काम पूर्ण होईल. प्रवाशांना या योजनेमुळे मोफत वायफायचा लाभ घेत हिंदी व मराठी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा आनंद प्रवासादरम्यान घेता येणार आहे. हा राज्यस्तरीय उपक्रम आहे. - राजीव घाटोळे, विभाग नियंत्रक रापम, वर्धा.
वर्धेतील ३१३ गाड्यांत वायफाय
By admin | Published: May 16, 2017 1:08 AM