पत्रकार परिषद : वर्धापनदिनी प्रवाशांचे स्वागत लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एसटी बसेसचे रूप पालटण्याचा प्रयत्न राज्य परिवहन महामंडळाकडून सुरू आहे. जिल्ह्यातील ३१३ बसेसमध्ये वायफाय सुविधा दिली जाणार असून यातील २०० बसेसमध्ये वायफाय सुविधा प्रदान करण्यात आली आहेत. सदर बसेसमध्ये तत्सम स्टीकर लावण्यात आले आहेत, अशी माहिती प्रभारी विभागीय नियंत्रक अविनाश राजगुरे यांनी दिली. राज्य परिवहन महामंडळाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय नियंत्रक कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सध्या प्रवाशांना बसेसमधील वायफाय सुविधेबद्दल विशेष माहिती नाही. यामुळे प्रवाशांना अवगत करण्यासाठी वाहकांना सूचना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. गुरूवारी वर्धापन दिनानिमित्त प्रत्येक बसस्थानकावर प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. वर्धा बसस्थानकावर राजगुरे, तरोळे, बोबडे, नवनीत सावल यांच्या हस्ते गुलाब पुष्प देत प्रवाशांचे स्वागत करून सुखकर प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी गुंडतवार, चौबे, खांडस्कर, वाणे व कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील अन्य बसस्थानकांवरही सकाळी ९ वाजता प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. वर्धापन दिनानिमित्त प्रत्येक बसस्थानकावर एसटी महामंडळाची माहिती देणारे, बसने प्रवास करण्यास प्रोत्साहित करणाऱ्या ध्वनी व चित्रफिती वाजविण्यात येत असल्याची माहितीही राजगुरे यांनी दिली. यावेळी विभागीय वाहतूक नियंत्रक स्मीता सुतवणे उपस्थित होत्या.आधुनिकतेची गरजमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे १९९५ पर्यंत जगात सर्वात मोठे महामंडळ म्हणून नावारूपास आले होते. यानंतर लंडन ट्रान्सपोर्टची नोंद झाली. एवढे जुने महामंडळ असताना आधुनिक बसेस आलेल्या नाही. महाराष्ट्राच्या तुलनेत आंध्रप्रदेश, कर्नाटक, पंजाब या राज्यांत अत्याधुनिक बसेस सेवेत आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही आधुनिकतेची कास धरणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले.‘त्या’ कर्मचाऱ्यांचे प्रकरण न्यायालयातबसमधील तिकीटांची तपासणी करणाऱ्या पथकांची मोबाईलद्वारे एकमेकांना दिली जात होती. यात ३६ चालक, वाहक कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यातील अमरावती विभागातील आठ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली होती. सदर प्रकरण न्यायालयात सुरू होते. त्याचा निकाल परिवहन महामंडळाच्या बाजूने लागला होता; पण कर्मचारी कामगार न्यायालयात गेल्याने सध्या ते कार्यरत आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांवरील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.