वर्धा : महाराष्ट्रातील गोशाळांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या ‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी वर्ध्यातील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था (एमगिरी)ला ‘नोडल एजन्सी’ म्हणून नियुक्त करण्यासाठी ‘एमगिरी’चे निदेशक डॉ. आशुतोष मुरकुटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर केला. त्याला मुख्यमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यताही दिली आहे.
बैठकीला केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांचीही उपस्थिती होती. ‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र’ योजनेंतर्गत पशुसंवर्धन मंत्रालयामार्फत पशुधनाच्या आधारे महाराष्ट्रातील ३२४ तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक गोशाळा निवडून १५ ते २५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल. या अनुदानाच्या रकमेतून ३२४ गो-शाळांमध्ये दूध न देणाऱ्या गायी आणि वृद्ध जनावरांची देखभाल, चारा शेडची व्यवस्था आणि प्रत्येक गोशाळेत पंचगव्यांचे उत्पादन आणि विक्री करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.
डॉ. आशुतोष मुरकुटे यांनी ‘एमगिरी’द्वारा विकसित केलेल्या पंचगव्य संबंधित तंत्राद्वारे महाराष्ट्रातील सर्व गोशाळा स्वयंपूर्ण आणि रोजगार निर्मिती केंद्र बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या गो-सेवा केंद्र योजनेतील ‘नोडल एजन्सी’ बनविण्याचा प्रस्ताव मांडला आहे. लवकरच पशुसंवर्धन मंत्रालयाशी चर्चा करून हे काम पुढे नेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. बैठकीत डॉ. मुरकुटे यांनी मुख्यमंत्र्यांना गांधी विचारधारेवर आधारित ग्रामोद्योगांना चालना देण्यासाठी संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि ‘एमगिरी’ने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची पुस्तिकाही त्यांना भेट म्हणून दिली.
‘एमगिरी’ने १७५ गोशाळांना दिले पंचगव्याचे प्रशिक्षण
देशात पंचगव्य उत्पादनांचे मानकीकरण आणि त्यांची परिणामकारकता यावर संशोधन करणारी आणि पंचगव्य आधारित उत्पादनांवर उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणारी एमगिरी, वर्धा ही देशातील एकमेव संस्था आहे. खादी ग्रामोद्योग आयोगाने गेल्या आर्थिक वर्षात राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्या शिफारशीवरून ‘एमगिरी’ला दिलेल्या प्रकल्पात देशातील १७५ गोशाळांतील लोकांना पंचगव्य आधारित उत्पादनांच्या उद्योगाचे यशस्वी प्रशिक्षण संस्थेचे डॉ. जयकिशोर छांगाणी यांच्या मार्गदर्शनात दिले गेले.