महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी येथील अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपी डॉ. नीरज कदम व डॉ. रेखा कदम यांच्या घराची झडती आर्वी पोलिसांनी घेतली असता काळविटाची कातडी सापडली होती. काळविटाची कातडी वनविभागाच्या परवानगीनेच कदम यांच्या घरी होती असे वनविभागाच्या तपासात पुढे आले आहे.आर्वी येथील अवैध गर्भपात प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असली तरी याच प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असताना आर्वी पोलिसांना १५ जानेवारी २०२२ रोजी डॉ. रेखा कदम आणि डॉ. नीरज कदम यांच्या निवासस्थानी थेट काळविटाची कातडी सापडल्याने पोलिसांचीही भांबेरीच उडाली होती. या प्रकरणी आर्वीच्या वनविभागाने आर्वी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या तक्रारीवरून डॉ. नीरज कदम यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९, ३९ अन्वये गुन्हा दाखल करून काळविटाची कातडी जप्त केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. नीरज कदम अजूनही न्यायालयीन कोठडीत आहेत. याच पार्श्वभूमीवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी डॉ. रेखा कदम यांचे सासरे तर डॉ. नीरज कदम यांचे वडील डॉ. कुमारसिंग कदम यांचे दाखल वन गुन्ह्याच्या अनुषंगाने बयाण नोंदविले. बयाण नोंदविताना त्यांनी काही दस्तऐवज वनविभागाला सादर केले आहेत. या दस्तऐवजानुसार २००४ मध्ये कदम यांनी स्वत: पुढाकार घेत आपल्याकडे काळविटाची कातडी असल्याची लेखी माहिती वनविभागाला दिली. त्यावर वनविभागाने ही वन्यजीवाची कातडी कुणाला न देण्यासह त्याची विक्री न करण्याच्या अटीवर कदम यांना स्वत:जवळ ठेवण्याची परवानगी दिली होती, असे सांगण्यात आले. त्यामुळे आता या वन गुन्ह्यात पुढे नेमके काय होते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
काळविटाची कातडी मिळाल्याने डॉ. नीरज कदम यांच्याविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला. अवैध गर्भपात प्रकरणी ते अद्यापही न्यायालयीन कोठडीत असून मध्यंतरी आम्ही डॉ. कुमारसिंग कदम यांचे बयाण नोंदविले. बयाण नाेंदविताना कुमारसिंग कदम यांनी काही कागदपत्रे आम्हांला सादर केली. त्यानुसार २००४ मध्ये त्यांनी काळविटाच्या कातडीबाबत वनविभागाला माहिती दिली होती. शिवाय त्या वन्यजीवाची कातडी कुणाला न देण्याच्या तसेच विक्री न करण्याच्या अटीवर कदम यांना स्वत:जवळ ही काळविटाची कातडी ठेवण्याची परवागी देण्यात आली होती.- नितीन जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, आर्वी.