बोरधरण येथील पर्यटन संकुल उपहारगृह प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क बोरधरण : येथील निसर्ग पर्यटन संकुलातील उपहारगृह गत तीन वर्षापासून बचतगटाच्या महिला चालवित होत्या. मात्र, संबंधीतांनी महिलांना अंधारात ठेवत हे उपहारगृह भाडेतत्त्वावर दुसऱ्याला दिले. त्यामुळे या महिलांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. सदर उपहारगृह महिला बचत गटाला देण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण आंदोलन सूरू करताच आंदोलनाची दखल घेत संबंधीतांनी नमते घेत अवघ्या तीन तासात बचत गटाला उपहारगृह चालविण्यासाठी देत असल्याचे लेखी पत्र दिले. महिला स्वयं सहायता बचत गटाच्या महिलांनी यासाठी सहायक कुकचे प्रशिक्षण घेवून गुणवत्ता सिद्ध केली आहे. पण, वन विकास महामंडळाने उपहारगृहावर उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांच्या तोंडचा घास हिसकावत हे उपहारगृह नागपूरच्या कंत्राटदाला दिले होते. उपहारगृह महिला गटाला देण्याचा ठराव ग्रा.पं.त घेण्यात आला होता; पण संबंधितांनी त्याला बगल देण्याचा घाट घातला. परिणामी, महिलांनी एकत्र येत आपल्या हक्कासाठी उपोषण आंदोलन सुरू केले. उपहारगृह महिलांना देण्याचे पत्र देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
उपोषण सुरू करताच काही तासांतच मिळाला महिलांना न्याय
By admin | Published: June 18, 2017 12:41 AM