पाणीसाठा शून्य : शेतकऱ्यांचा रस्ता झाला बंद, १४ एकर शेती पडिकलोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शिरकुटणी येथे दीड वर्षांपूर्वी बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले होते; पण संबंधित यंत्रणेने या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने बंधाऱ्याला दोन ठिकाणी भेगा पडल्या आहेत. शिवाय नाला खोलीकरण केल्याने शेतकऱ्याचा रस्ता बंद करण्यात आला आहे. यामुळे १४ एकर शेती पडिक राहिली. याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. मौजा शिरकुटणी शिवारात सर्व्हे क्र. ६६/१, ६६/२ हे शेत महिला शेतकरी पुष्पा कांदे, अर्चना कडवे यांच्या मालकीचे आहे. एकूण आराजी १४ एकर आहे. या शेतात अगदी धुऱ्यावर बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. यासाठी १२ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. बंधारा बांधकाम झाल्यावर नाला खोलीकरण करण्यात आले. याठिकाणी असलेला शासकीय पांदण रस्ता पूर्णत: खोदकाम करून बंद करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी वारंवार रस्ता मोकळा करून देण्याची मागणी करण्यात आली; पण जि.प. लघुसिंचन उपविभागाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. आता बांधकामाचा सूमार दर्जा समोर आल्याने या विभागात सध्या खळबळ माजली आहे. निकृष्ट दर्जाचे काम केल्याने एवढा मोठा बंधारा बांधूनही पाणीसाठा होताना दिसत नाही. सदर काम वर्धा येथील अग्रवाल एजेंसीने केल्याचे अभियंत्याकडून सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी १४ एकर शेती मागील दोन वर्षांपासून पडिक ठेवली आहे. शेताचा बराच भाग नाला खोलीकरणात खोदून आराजीदेखील कमी करण्यात आली आहे. सदर बंधारा बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली असता समोरून भेगा पडल्याचे दिसून आले. मागील बाजूला भगदाड पडले आहे. या कामात मोठ्या प्रमाणात गिट्टीऐवजी गोटे टाकल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. या कामाचा फलक उभारण्यात आला असून त्यावर प्राकलन किंमत टाकली नाही. यामुळे नेमके किती रुपयांचे काम आहे, याचा अंदाज येत नाही. लघुसिंचन विभागाने बंधाऱ्याची दुरुस्ती करावी. १४ एकर शेताची नुकसान भरपाई द्यावी व खोदलेला रस्ता पाईप टाकून दुरूस्त करून द्यावा, अशी मागणी शेतकरी कांदे, कडवे यांनी निवेदनातून केली आहे. रस्ता करून देण्यासही दोन वर्षांपासून टाळाटाळजिल्हा परिषद लघुसिंचन विभागाच्यावतीने शिरकुटणी येथे शेतालगत बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. यानंतर नाला खोलीकरण करण्यात आले. हे करीत असताना शेताची वहिवाट करण्याकरिता असलेल्या पांदण रस्त्याचेही खोदकाम करण्यात आले. यानंतर सदर पांदण रस्ता दुरूस्त करून देणे वा पुलाचे बांधकाम करीत शेतीच्या वहिवाटीसाठी रस्ता तयार करून देणे गरजेचे होते; पण रस्ता तयार करण्यात आला नाही. रस्ता करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने दोन वर्षांपासून १४ एकर शेती पडिक आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शिवाय खोदकामात शेताची आराजीही कमी झाली. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.जिल्हा परिषद लघुसिंचन उपविभाग आर्वीकडून बंधारा बांधकाम करण्यात आले. यात माझ्या शेताचा रस्ता खोदून नाला करण्यात आला. याची दुरुस्ती न केल्यास मला उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल. - पुष्पा कांदे, महिला शेतकरी, आष्टी (शहीद). सदर बंधारा व नाला खोलीकरणामुळे रस्ता बंद झाल्याची पाहणी करतो. यामध्ये दोषी आढळल्यास कारवाई करणार आहे. रस्ता दुरुस्त करून देण्यास सांगण्यात येईल.- एच.पी. गहलोत, कार्यकारी अभियंता, जि.प. लघुसिंचन विभाग, वर्धा.
दीड वर्षांत बंधाऱ्याला पडल्या भेगा
By admin | Published: July 11, 2017 12:59 AM