वर्धा : आर्वी, पुलगाव, हिंगणघाट, वर्धा आणि तळेगाव(श्या) या पाचही आगारातील अनेक बसेस भंगारावस्थेत आहे़ बसेस कोणत्या गावाला जात आहेत, याबाबतचे फलकही बरेचदा राहत नाही़ फलकाविनाच बहुतेक बसेस धावतात. यामुळे प्रवाशांची तारांबळ उडते; परंतु आगारांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. राज्य परिवहन महामंडळाची प्रत्येक बस कोणत्या स्थानकावरून कोणत्या स्थानकापर्यंत जाणार आहे़ ती कोणत्या मार्गाने व कोणत्या गावाहून जाणार आहे, याची प्रवाशांना स्पष्ट माहिती मिळावी म्हणून बसेसला गावाच्या नावाचे फलक दिले जातात़ प्रत्येक बस नामफलकासह धावावी,, असा राज्य परिवहन महामंडळाचा नियमही आहे; पण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या नियमाला हरताळ फासला जात आहे़ आर्वी आगाराच्या अनेक बसेस नामफलकाविनाच धावत असल्याचे दिसून येते़ यामुळे प्रवासी प्रत्येक बसपर्यंत धावत जातात. एसटी चालक व वाहकांना विचारणा करतात आणि आपल्या मार्गाची नाही म्हणून परत येतात. यातही काही वाहक, चालक मुखजड असतात. एसटी कुठे चालली हे सांगण्याचे सौजन्यही ते दाखवित नाहीत़ यामुळे एसटी प्रवाशांना सुखासाठी की त्रासासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ शिवाय आर्वी आगारातील बसेसचे वेळापत्रक अत्यंत अव्यवहारिक आहे़ एखाद्या मार्गावर विशिष्ट कालावधीत दहा-दहा बसेस जातात तर दुसऱ्या मार्गावर त्याच कालावधीत एकही बस धावत नाही. परिणामी, एका मार्गावरील बसेस रिकाम्या धावतात. एखादा त्रस्त प्रवासी चौकशी अधिकाऱ्यास विचारणा करण्यास गेल्यास सदर अधिकारी, गाडी आल्यावर लागेल, असे उत्तर देतात़ बस आली की धावणे आणि आपल्या मार्गाची आहे की नाही, याची शहानिशा झाली की पुन्हा कुठे तरी उभे राहणे, याशिवाय पर्याय राहत नाही़ सध्या थंडीचे दिवस आहेत. अनेक जण सकाळी सकाळी बसने प्रवास करतात. अशावेळी थंडीपासून रक्षण व्हावे यासाठी खिडक्या लावण्याचा प्रयत्न करतात. परंतु अनेक बसच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत तर अनेक बसेसच्या खिडक्या लागायला तयार नसतात. त्यामुळे प्रवाशांना थंडी सहन करीत प्रवास करावा लागतो. प्रत्येक आगारात काही नव्या बसेस देण्यात आल्या आहेत त्या बसेसचा उपयोग हा लांब पल्ल्यासाठी केला जातो. त्यामुळे ग्रामीण भागाच्या नशिबी भंगार झालेल्या जुन्या बसेस येतात. पावसात गळणे, खड्ड्यातून उसळल्यावर गेट उघडणे, अर्ध्या प्रवासात बंद पडणे आदी प्रकारांसह आता नामफलकाविनाच धावणाऱ्या बसेस प्रवाशांना नवीन डोकेदुखी ठरत आहे. अनेक आगारात वेळापत्रकानेही प्रवाशांची गोची केली आहे. काही मार्गावर खासगी वाहतूक ही मोठ्या प्रमाणात चालते. त्यामुळे अशा मार्गावर बसमध्ये तितकीशी गर्दी नसते. पण काही मार्गावर बसशिवाय पर्याय नसतो. नेमक्या अशाच मार्गावर बसेस कमी दिल्या जातात. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे लक्ष देत ‘प्रवाशांच्या सेवेत’, हे एसटीचे ब्रीद सार्थकी लावण्याही गरज आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. त्यातच अनेक बसेसचे टायरही झिजले आहे. त्यामुळे प्रवास करताना असंख्य हादरे बसतात. अमेकदा बसेस पंक्चरही होतात. त्यामुळे सर्व समस्यांचे माहेरघर बसेस झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे.(शहर प्रतिनिधी)
नामफलकाविना एसटी गावोगावी
By admin | Published: December 27, 2014 2:18 AM