वर्धा : चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयातील नवजात शिशू कक्षातून अवघ्या चार दिवसांच्या नवजात शिशूची चोरी करणाऱ्या महिलेस वर्धा पोलिसांनी हिंगणघाट येथून २० रोजी अटक केली. बाळाची वैद्यकीय तपासणी करून वरोरा पोलिसांच्या स्वाधीन करीत बाळाला सुरक्षितरीत्या त्याच्या माता-पित्याच्या स्वाधीन केले. शबाना सुभान शेख (२६, रा. हिंगणघाट) असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून, तिला चंद्रपूर पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती आहे.
चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मीरा नामक महिलेची चार दिवसांपूर्वी प्रसूती झाली होती. नवजात शिशू शासकीय रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात ठेवले होते. दरम्यान, आरोपी शबाना नामक महिला मागील काही दिवसांपासून रुग्णालय परिसरात वावरत होती. २० रोजी पहाटेच्या सुमारास शिशू कक्षातील बाळ चोरी झाल्याचे समजताच पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, एक महिला बाळ उचलून नेताना दिसली.
तांत्रिक पद्धतीने तपास केला असता, सदर महिला हिंगणघाट येथे जात असल्याचे समजले. चंद्रपूर पोलिसांनी वर्धा पोलिसांशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवून शोध मोहीम सुरू केली असता, हिंगणघाट बसस्थानकावर एक महिला बाळ घेऊन असल्याचे आढळून आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिसांनी महिलेला बाळासह ताब्यात घेत चौकशी केली असता, तिने आपले नाव शबाना सुभान शेख (रा. हिंगणघाट) असे सांगितले. चंद्रपूर पोलिसांचे पथक हिंगणघाट येथे आले असता, वर्धा पोलिसांनी चोरट्या महिलेस अटक करून बाळाला सुरक्षितरीत्या चंद्रपूर पोलिसांच्या स्वाधीन केले.
स्वत:ला बाळ झाल्याचा बनाव
चोरट्या महिलेस पोलिसांनी हिंगणघाट येथील बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले असता, तिने स्वत:ला बाळ झाल्याचा बनाव केला. दुसऱ्यांदा लग्न झाल्याचे सांगून तिने स्वत:च गर्भवती असल्याची नोंद अंगणवाडीत यापूर्वीच केली होती. इतकेच नव्हे, तर तिने स्वत:ला बाळ झाल्याची माहितीदेखील तिच्या नातेवाईक व परिवारातील लोकांना दिली. मागील अनेक महिन्यांपासून ती चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात भटकत होती.
--