वर्धा : वर्धा जिल्ह्याला महापुरुषांचा वारसा लाभाल्याने जिल्ह्यात दारुबंदी झाली. मात्र, तरीही आजघडीला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची उलाढाल होते, हे धडधडीत वास्तव आहे. पोलिस अधीक्षक नुरुल हसन वर्ध्यात येताच त्यांनी दारुविक्रेत्यांना सळो की पळो करून सोडले. दारूअड्डे बंद झाले. अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले. मात्र, तरीही काही दारूविक्रेते विविध शक्कल लढवून दारूविक्री करतातच, हे या घटनेने अधोरेखित झाले आहे.
एका महिलेने चक्क घरातील देव्हाऱ्यालाच दारूअड्डा बनवल्याचे सावंगी पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघडकीस आले. सालोड गावातील एक महिला दारूविक्री करते, अशी माहिती सावंगी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांकडून सालोड गावातील रहिवाशांकरवी त्या महिलेवर ‘वॉच’ ठेवला जात होता. मात्र, ती दारू विकताना आढळून येत नव्हती. अखेर सावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनाजी जळक, श्रावण पवार यांनी कर्मचाऱ्यांसह सालोड हिरापूर गाव गाठून महिलेच्या घराची तपासणी केली असता घरातील देवघरातच दारू लपवून ठेवलेली आढळून आले. पोलिसांनी दारूविक्रेत्या महिलेला अटक करून तिच्याकडून तब्बल १० हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त केला.
‘देवघराला’ केली होती रोषणाई
पोलिसांना संशय येऊ नये, म्हणून दारूविक्रेत्या महिलेने घरातील देवघराच्या ड्राव्हरमध्ये दारूसाठा लपविण्याची अजब शक्कल लढविली. यासाठी तिने देवघराला रोषणाई केली होती. संपूर्ण घराची तपासणी केल्यानंतर पोलिसांची नजर देवघरावर पडली अन् बिंग फुटले.
अन् पोलिसही झाले अवाक्...
दारूविक्रेती महिलेच्या घरी सावंगी पोलिसांनी छापा मारला असता पोलिसांना देवघरात दारू मिळून आली. देव्हाऱ्याच्या अगदी खालच्या ड्राव्हरमधून दारूच्या बाटल्यांचा खच काढताच उपस्थित पोलिसही हे पाहून अवाक् झाले.
दररोज कारवाई तरीही दारुविक्री सुरुच..
पोलिस विभागाकडून दररोज दारुविक्रेत्यांवर कारवाई करून लाखों रुपयांचा दारुसाठा पकडून गुन्हे दाखल केले जात आहे. मात्र, तरीही काही मुजोर पोलिसांच्या नाकावर टिच्चून दारुविक्री करीत असल्याचे शहरात चित्र आहे.
ग्राहकाची ‘टीप’ अन् यशस्वी कारवाई
सालोड गावातील महिला दारूविक्री करीत असल्याची माहिती सावंगी पोलिसांना होती. पोलिसांनी मागील महिनाभरापासून तिच्यावर करडी नजर ठेवली होती. पण, पोलिस यशस्वी होत नव्हते. अखेर तिच्याकडे दारू पिण्यासाठी जाणाऱ्या ग्राहकाला पकडून पोलिसी हिसका दाखवला असता त्याने दारू आणताना खर्रर्र आवाज येत असल्याचे सांगितले. पण, नेमका तो आवाज कोठून येत होता, हे त्याला माहिती नव्हते. अखेर पोलिसांनी देव्हाऱ्यातील ड्राव्हरची तपासणी केली असता ड्राव्हर उघडताना आवाज आला अन् पोलिसांना संशय आला. पोलिसांनी ड्राव्हरमध्ये हात टाकला असता दारूच्या शिशाच हाती लागल्या.