वर्धा : रोजमजुरी करणाऱ्या महिलेला रस्त्यात अडवून दुचाकीवर आलेल्या अनोळखी तिघांनी चाकूचा धाक दाखवून ‘सब माल दे, नही तो मार डालूंगा’ अशी धमकी देत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, बेनटेक्सच्या बांगड्या आणि मजुरीचे मिळालेले १० हजार रुपये रोख असा एकूण १२ हजार ५०० रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेत दुचाकीने धूम ठोकली.
ही घटना साईनगर परिसरात घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. रामनगर पोलिसांनी ३ रोजी रात्री अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.
सुनिता अरुण नरांजे (४०) रा. आलोडी ही सायंकाळच्या सुमारास मजुरीचे मिळालेले १० हजार रुपये घेऊन साईनगर परिसरातून घराकडे पायदळ जात असताना दुचाकीवरुन एक मुलगा आला आणि थांबण्यास सांगितले. सुनिता थांबली असता विरुद्ध दिशेने दुचाकीवरुन चेहरा बांधून दोन युवक आले. त्यातील एका युवकाने सुनिताला चाकूचा धाक दाखवून जवळील सर्व ऐवज देण्यास सांगितले, अन्यथा जीवे मारण्याची धमकी दिली.
तिघांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तसेच प्लास्टिक पिशवीत ठेवलेले मजुरीचे १० हजार रुपये, बेनटेक्सच्या बांगड्या असा एकूण १२ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून दुचाकीने पळ काढला. महिलेने आरडाओरड केली असता नागरिकांनी धाव घेतली. महिलेने तत्काळ रामनगर पोलिस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. याप्रकरणी अज्ञात तिघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.