वर्धा : पती-पत्नीत वारंवार खटके उडू लागले. अशातच पत्नीचे दीड वर्षांपूर्वी एका युवकाशी सूत जुळले. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे पतीला माहिती झाले अन् दोघांत वाद सुरू झाला. आता पतीला संपवायचेच. असे मनात ठासून अखेर प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने पतीला धारदार शस्त्राने मारहाण करीत हत्या करून मृतदेह पोत्यात भरून घराच्या अवघ्या ५० मीटर अंतरावर असलेल्या शिक्षकाच्या घरासमोर नेऊन फेकला.
ही घटना गुरुवारी मध्यरात्री १ ते १.३० वाजताच्या सुमारास घडली. शुक्रवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्याने या हत्याकांडाने आष्टी शहर मात्र हादरून गेले. पोलिसांनी याप्रकरणी तिघांनाही अटक केल्याची माहिती दिली.
जगदीश भानुदास देशमुख (३८, रा. नवीन आष्टी) असे मृतकाचे नाव असून, पत्नी दीपाली देशमुख (३२), प्रियकर शुभम जाधव (२२), साथीदार विजय माने (२१) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.
मृतक जगदीश देशमुख हा गवंडी कामगार होता. त्याचा विवाह दीपालीसोबत झाला होता. त्याला पाच वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा आहे. दोघांचाही संसार सुरळीत सुरू होता. पण, जगदीशला दारूचे व्यसन जडले होते, त्यामुळे जगदीश आणि दीपालीमध्ये वारंवार खटके उडत होते. याच कारणाने पत्नी दीपाली ही माहेरी निघून गेली होती. परत आली असता जगदीश आणि दीपाली हे दोघे वेगळे राहू लागले. पतीपासून त्रस्त दीपालीचे शुभम जाधव याच्याशी सूत जुळले. याची माहिती जगदीशला झाल्याने त्याने पत्नी दीपालीशी वाद केला. अखेर मध्यरात्री पत्नी दीपाली, प्रियकर शुभम आणि त्याचा मित्र विजय यांनी मिळून जगदीशच्या डोक्यावर सेंट्रिंगच्या पाटीने जबर वार करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच धारदार शस्त्राने वार करीत जगदीशची हत्या करून मृतदेह पोत्यात भरून रस्त्याच्या कडेला फेकून दिला.
शहराबाहेर मृतदेह फेकण्याचा होता प्लॅन
जगदीशची हत्या करून मृतदेह पोत्यात भरून नवीन आष्टी शहराच्या बाहेर फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा बेत तिन्ही आरोपींनी आखला होता. मात्र, अज्ञात व्यक्तीने तिघांना पाहिल्याने आरोपींनी शिक्षक दिनेश टेकाडे यांच्या घराजवळ असलेल्या गल्लीत पोत्यात भरलेला मृतदेह फेकून दिला.
शिक्षकाची सतर्कता
शिक्षक दिनेश टेकाडे हे पहाटेच्या सुमारास वॉकला निघाले असता त्यांना रस्त्याकडेला पोते दिसून आले. त्यांनी पोत्याला हात लावला असता त्यांच्या हाताला नरम काही तरी लागल्याने याची माहिती त्यांनी गृहरक्षक उमेश धानोरकर यांना दिली. उमेशने पोत्याची पाहणी केली असता मृतदेह दिसून आला. त्याने याची माहिती ठाणेदार लक्ष्मण लोकरे यांना दिली. ठाणेदारांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदानासाठी आर्वी रुग्णालयात पाठविला.
पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट
या हत्याकांडाने अख्खे शहर हादरून उठले. घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी भेट देत पाहणी केली. याची माहिती गावात पसरताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी उसळली होती.