लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: कोरोना संकट काळात वटपौर्णिमेचे औचित्य साधून आपल्या कर्तव्यासह पत्नीधर्माचे पालन शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केले. याप्रसंगी महिला पोलिसांनी खाकी वर्दी परिधान करून कोरोनाचे संकट जाऊ दे तसेच माझ्या पतीला दीर्घ आयुष्य लाभू दे, असे साकडेच वटवृक्षाला घातले.सध्या देशासह जगातील विविध देश कोरोना संकटाशी लढा देत आहे. अशातच कोविड योद्धा म्हणून पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारीही सेवा देत आहेत. सतत २४ तास सेवा देणाऱ्या पोलीस विभागातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना यंदाच्या कोरोना संकटात वटपौर्णिमेचे औचित्य साधून पतीव्रता धर्माचे पालन करणे थोडे कठीण होते. पण त्यावरही मात करून पहिले कर्तव्य आणि त्याच बरोबर रुढीपरंपरेनुसार धर्माचे पालन आज शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केले. शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी ज्योती देवकुळे, अलका टिपले, संगीता तामगाडगे, प्रिती ढेपे, रंजिता कोडापे यांच्यासह गृहरक्षक दलातील रेखा नैताम, शुभांगी मेश्राम, सोनम निकुडे यांनी शुक्रवारी शहर पोलीस ठाण्याच्या आवारातील वटवृक्षाचे पूजन केले.
कर्तव्यही गरजेचेच - टिपलेप्रत्येक वर्षी आम्ही वटपौर्णिमेचे औचित्य साधून घरी वटवृक्षाचे पूजन करीत होतो. परंतु, यंदा कोरोना संकटामुळे आम्हाला सलग २४ तासही कर्तव्य बजावावे लागत आहे. खाकी परिधान केल्यावर आम्ही कर्तव्याला प्राधान्य देतोच. कोरोनाच्या संकटात कर्तव्याला प्राधान्य देऊन आम्ही आज रुढीपरंपरेनुसार भारतीय नारी म्हणून वटवृक्षाचे पूजन केले आहे. खाकीवर्दीत वटपौर्णिमा साजरी करताना आम्हाला एकप्रकारे गर्वच वाटत आहे, असे महिला पोलीस कर्मचारी अलका टिपले यांनी सांगितले.