नवजीवन योजनेंतर्गत उपक्रम : स्वयंरोजगारासाठी पोलिसांचा पुढाकारदेवळी : आंजी पारधी बेडा लोकवस्तीतील महिलांना खादी सुतकताई यंत्र वितरित करण्यात आले. वर्धा पोलिसांच्या नवजीवन योजनेंतर्गत हा कार्यक्रम पार पडला. साती (पोटी) येथील सिद्ध गणेश जनकेश्वर देवस्थान सभागृहात आयोजित कार्यक्रमाला अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे, तहसीलदार तेजस्वीनी जाधव, भूमिअभिलेख अधिकारी कोमल कराळे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने, उपनिरीक्षक गजानन दराडे आदी उपस्थित होते.पारधी बेड्यावरील महिलांना स्वयंरोजगार प्राप्त करून देण्यासोबतच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस यंत्रणा व वंदना फाऊंडेशन मुंबईच्यावतीने हा उपक्रम राबविला जात आहे. पारधी समाजातील महिलांना सुतकताईचे प्रशिक्षण देऊन त्यांना यासाठी लागणाऱ्या साहित्याचे वाटप ही संस्था करणार आहे. कार्यक्रमात पारधी बेडा लोकवस्तीतील पाच महिलांना सुतकताई यंत्राचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. दिवसभरात एका यंत्रावर ४० सुताचे बंडल बनविण्याचे धोरण ठरविण्यात आले. एका बंडल मागे ६ रुपये याप्रमाणे मजुरी देणार असल्याचे सांगण्यात आले. फिनाईल बनविणे तसेच त्यांची विक्री करण्याचे प्रशिक्षण यापूर्वी वायफड पारधी बेड्यावर देण्यात आले. या समाजातील पुरूष व महिलांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासह त्यांच्या स्वयंरोजगारासाठी पावले उचलली जात असल्याचे मदने यांनी प्रास्ताविकातू सांगितले. यावेळी तालुक्यातील पोलीस पाटील, देवस्थानचे अध्यक्ष सुरकार, उपाध्यक्ष उमाटे, उद्योजक विनोद घीया व नागरिक उपस्थित होते.(प्रतिनिधी)
पारधी बेड्यावरील महिलांना ‘सुतकताई यंत्र’
By admin | Published: September 22, 2016 1:10 AM