वर्धा : निर्मलग्राम योजनेंतर्गत प्रत्येक घरी शौचालय असावे म्हणून अनुदान जाहीर करण्यात आले; पण ग्रामीण भागात कुटुंब प्रमुख या योजनेस प्रतिसाद देत नसल्याचे दिसते़ यामुळे आमगाव (खडकी) येथील महिलांनी किसान अधिकार अभियानच्या नेतृत्वात पतींविरूद्धच चुलबंद आंदोलन पुकारले़ शौचालय बांधण्याची जबाबदारी पती स्वीकारत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय महिलांनी घेतला़ या अभिनव आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले़ आरोग्य सुरक्षिततेसाठी शासन विविध योजना राबवित आहे; पण कुटुंब प्रमुख पतीदेव या योजनेकडे पाठ फिरवित आहे़ यामुळे ग्रामीण भागात स्त्रियांची शौचास जाण्याची अडचण होते़ ग्रामीण भागात शौचालयांचा अभाव असल्याने नागरिक रस्त्याच्या कडेला शौैचास बसून दुर्गंधीमय वातावरण निर्माण करतात़ उघड्यावर शौचास बसल्याने विविध साथ रोग निर्माण होतात, याची जाण ग्रामीण जनतेला असताना याकडे दुर्लक्ष केले जाते़ आई, बहिणी उघड्यावर शौचास बसत असल्याने अस्वच्छतेमुळे पोटदुखीचे आजार वाढत आहेत़ निर्मलभारत अभियान व मनरेगा योजनेच्या माध्यमातून प्रती शौचालय ९ हजार १०० रुपये अनुदान शासन देत असताना पती कुंटुंबासाठी शौचालय बांधण्याकडे दुर्लक्ष करीत आहे़ चुलबंद आंदोलनात सुदाम पवार यांनी शासनाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयाविरूद्ध जनता आंदोलने, निदर्शने करतात़ आता कुटुंबासाठी शौचालयाची व्यवस्था करण्यात पुरूष प्रधान संस्कृतीमध्ये पतीदेव जर दुर्लक्ष करीत असतील तर असहकार चुलबंद आंदोलन करणे गरजेचे आहे, असे सांगितले़या आंदोलनात निर्मला ठाकरे, फुला पवार, आरती पवार, विद्या मरस्कोल्हे, शीला चव्हाण, लीला जाधव, पूजा पवार, जयश्री पवार, सत्यभामा पवार, इंदू मसराम, शालिनी ठाकरे, रेखा पवार, समाधान पवार, अनिल तेलरांधे, जयराम पवार, गोविंदा पवार, चंद्रभान आत्राम, अक्षय पवार, देवलाल चव्हाण, सुरेश मोहिते, पद्माकर मरस्कोेल्हे आदींनी सहभाग घेतला़(कार्यालय प्रतिनिधी)
शौचालय बांधण्यासाठी महिलांचे ‘चुलबंद’
By admin | Published: June 26, 2014 11:26 PM