जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : सिलिंडर दरवाढीचा निषेध वर्धा : शासनाच्यावतीने गॅससिलिंडरची दरवाढ करून आम जनतेला माहागाईच्या खाईत लोटल्याचा आरोप करीत शनिवारी महिला काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने दिली. यावेळी विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस व जिल्हाध्यक्ष हेमलात मेघे यांची उपस्थिती होती. निवेदन देताना गॅस सिलिंडरच्या दरवाढीसह शेतकऱ्यांना होत असलेल्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. विविध बाजार समितीत नाफेड व इतर शासकीय यंत्रणेकडून होत असलेल्या तूर खरेदीत शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले. तसेच शेतमालाला देण्यात येणारे दर शेतकऱ्यांना मागास बनविणारे असल्याचा आरोपही करण्यात आला. या आंदोलनात महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्य व जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी) आपचेही जिल्हाधिकाऱ्यांना साकडे वर्धा : केंद्रात मोदी सरकार आल्यापासून घरगुती वापरासाठी, लागणाऱ्या गॅस सिलिंडरच्या भाववाढीत कमालीची वाढ झाली असून १ मार्चपासून गॅस सिलिंंडरच्या भावात ८६ रूपयांची वाढ झाली आहे. या विरोधात आपच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. गत कित्येक दिवसांपासून पेट्रोलचे ६३ रुपयांपासून ७७ रुपयांपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे मध्यमर्गीयांचे घरगुती आर्थिक बजेट गडबडले आहे. त्यामुळे देशातील गरीब मजूर शेतकरी वर्ग यांना कोणी वाली नसल्याचे म्हणत भाववाढीवर नियंत्रण आणावे अन्यथा आम आदमी पार्टी देशभरात आंदोलन उभारेल अशा इशारा पार्टीचे सचिव प्रमोद भोमले यांनी निवदेनातून दिला आहे. निवेदन देतेवेळी आपचे संयोजक रवींद्र साहू, उपाध्यक्ष तुळशीराम वाघमारे, कोषाध्यक्ष प्रमोद भोयर, अरूण महाबुधे, बेंडे, मयुर राऊत, रवी बाराहाते, नितीन झाडे, मयुर डफरे, रमेश खुर्गे, मुल्ला, समीर राऊत, प्रशांत डफ, आदीं उपस्थित होते.(प्रतिनिधी)
महिला काँग्रेसची निदर्शने
By admin | Published: March 05, 2017 12:30 AM