सूर्यबाला लाल : दक्षिणायन चित्रपट महोत्सव वर्धा : असे म्हटले जाते की महिलांना मोठा संघर्ष करावा लागतो, तो तर करावाच लागतो, तो खरा पहिल्यांदा तिला आपल्या स्वत:शीच असतो त्यातूनच जी स्त्री बाहेर पडते तेव्हा कुठे ती समर्थपणे संघर्षास उभी राहू शकते. महिलांची खरी स्पर्धा स्वत:शीच असते, असे प्रतिपादन दक्षिणायन चित्रपट महोत्त्सवाच्या उदघाटन प्रसंगी सुप्रसिद्ध हिंदी लेखिका सूर्यबाला लाल यांनी केले. स्थानिक यशवंतराव दाते स्मृती संस्था व इप्टा यांच्या संयुक्त विद्यमाने शिववैभव शिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित उद्घाटन कार्यक्रमाला दिल्ली दूरदर्शनच्या अतिरिक्त महानिदेशक दीपा चंद्रा, फिल्म समीक्षिका विजय शर्मा (जमशेदपूर), हिंदी विद्यापीठातील नाट्य व चित्रपट विभागाचे प्रा. डॉ सतीश पावडे, मुख्य संयोजक डॉ राजेंद्र मुंढे, दाते संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांची प्रमुख उपस्थिती होती. चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाची भूमिका डॉ राजेंद्र मुंढे यांनी विषद केली. पाहुण्यांचा परिचय सुरभी विप्लव यांनी करून दिला. सतीश पावडे यांनी वर्ध्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक विषयावर प्रकाश टाकला. डॉ धनंजय सोनटक्के यांनी स्त्री-पुरुष जीवनाच्या गाडीचे दोन चाके आहेत, असे सांगितले. फक्त नवराच गृहीत धरला जातो. परंतु, प्रत्येक स्त्रीच्या जीवनात वडील, भाऊ, मामा यांचे देखील स्थान महत्त्वाचे असते, असे दीपा चंद्रा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. या महोत्सवात दाखविण्यात आलेल्या एरिन ब्रोकोविच या चित्रपटावर समीक्षा पुस्तक लिहीणाऱ्या विजय शर्मा यांनी एका असह्य जीवन जगणाऱ्या स्त्रीने अमेरिकेसारख्या देशात दिलेल्या पर्यावरण संरक्षण लढ्याची गोष्ट सांगितली. संचालन डॉ. स्मिता वानखेडे यांनी केले तर आभार रंजना दाते यांनी मानले. या मुख्य कार्यक्रमासह यशवंत महाविद्यालयात आणि प्रियदाशिनी महिला महाविद्यालयात सकाळी दक्षिणायन चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे केतन मेहता दिग्दर्शित ' मिर्च मसाला ' हा चित्रपट दाखवण्यात आला. तेथील कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख, डॉ. अतूल सिदूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. अरुणा हरले यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. प्रियदाशिनी महिला महाविद्यालयात मंथन हा सिनेमा दाखविण्यात आला. यावेळी धनजय सोनटक्के, डॉ. अनिता देशमुख, डॉ. मालिनी वडतकर, प्रा. सुचिता ठाकरे यांची उपस्थिती होती. पुलगाव येथील सुवालाल पाटणी महाविद्यालयात प्रा. रामटेके यांच्या प्रमुख उपस्थित मंथन हा चित्रपट दाखविण्यात आला. कार्यक्रमाला राजू बावणे, किशोर माथनकार, आकाश दाते यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)
महिलांची खरी स्पर्धा स्वत:शीच असते
By admin | Published: March 12, 2017 12:39 AM