ग्रामस्थांच्या मागणीची अखेर पूर्तता : पं.स.च्या मासिक सभेत चर्चा लोकमत न्यूज नेटवर्क घोराड : एका ग्रामसेवकांवर अधिक ग्रामपंचायतीचा कार्यभार असल्यास कार्यालयाच्या दर्शनी भागावर कामकाजाच्या दिवसाचा फलक लवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. पंचायत समितीच्या मासिक सभेत यावर चर्चा करण्यात आली. यानंतर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत कार्यालयाच्या दर्शनी भागावर कामकाजाच्या दिवसाचा फलक लावण्यात आला आहे. ग्रामस्थांनी केलेल्या मागणीची पूर्तता झाल्याचे चित्र विविध ग्रामपंचायत कार्यालयात गेल्यावर पाहायला मिळते. पंचायत समितीच्या मासिक सभेत पं.स. सदस्य बंडू गव्हाळे यांनी सदर मुद्दा मांडला होता. त्यानुसार ज्या ग्रामसेवकांकडे एकाहून अधिक ग्रामपंचायतचा कार्यभार आहे त्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या दर्शनी भागावर कामकाजाचे दिवस, कामाची वेळ व मोबाईल क्रमांक, माहिती अधिकारी अशी माहिती देणारे फलक लावण्यात यावे. यामुळे नागरिकांना योग्य माहिती मिळेल तसेच कामाकरिता ग्रामसेवकांची प्रतीक्षा करावी लागणार नाही. या सूचनेवर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बी.के. वरघणे, यु.डी. चौहान यांनी सर्व ग्रामपंचायतींना सदर फलक लावण्याची सूचना केली. यानंतर असे फलक सर्वच ग्रामपंचायत कार्याल्याच्या दर्शनी भागावर लागल्याने ग्रामस्थ व बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांच्या वेळेची बचत होत आहे. या विषयाला अनुसरुन उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दोनपेक्षा अधिक ग्रामपंचायतीचा कार्यभार असल्यास कामकाजाच्या दिवसाची माहिती ग्रामपंचायत कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावण्याबाबत पत्र गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते. यानंतर गटविकास अधिकारी यांनी सदर सूचना संबंधीत ग्रा.पं.ला दिल्याने तालुक्यातील ग्रा.पं.ने. याची अंमलबजावणी केल्याचे दिसून येते.
ग्रा.पं.च्या दर्शनी भागावर लागला कामकाजाच्या दिवसांचा फलक
By admin | Published: June 17, 2017 12:55 AM