वर्धा : विविध मागण्यांना घेऊन मनरेगा कर्मचारी युनियनच्या नेतृत्वात गेल्या काही दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील कामे खोळंबली असून मजूरवर्गावरही उपासमारीचे वेळ ओढावली आहे.स्थानिक प्रशासन व शासनदरबारी मनरेगांतर्गत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी, डाटा एन्ट्री आॅपरेटर, ग्रामरोजगारसेवक यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. सदर मागण्या संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने मनरेगा कर्मचारी युनियनच्या नेतृत्वात कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले. यामुळे मनरेगांतर्गत अनेक कामे खोळंबली आहेत. ग्रामरोजगारसेवक कामावर नसल्याने मजूरवर्गही अडचणीत आहेत. ग्रामपंचायतीची विविध कामे या योजनेंतर्गत केली जाते. त्या शिवाय शेतकऱ्यांच्या शेतातील फळबाग लागवडीचे काम व त्याची देखभाल करण्याचे कामसुद्धा करण्यात येते. या संपूर्ण कामांचा लेखाजोखा संबंधित कार्यालयात रोजगारसेवक सादर करतो. जोपर्यंत तो लेखाजोखा सादर करीत नाही, तोपर्यंत मजुरी मिळत नाही. त्यामुळे आतापर्यंत ज्या मजुरांनी कामे केली आहेत, त्यांची मजुरी अद्यापही मिळाली नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात मनरेगा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी जि.प. अध्यक्ष चित्रा रणनवरे, जि.प. सदस्य राणा रणनवरे, जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे, जि.प. सदस्य छोटू चांदूरकर यांची भेट घेऊन न्याय्य मागण्या निदर्शनास आणून दिल्या. राजू गोरडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळासोबत चर्चा करताना जि.प. अध्यक्षांनी तत्काळ न्याय न मिळाल्यास आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले. शासनाने मनरेगा कर्मचारी वर्गाच्या मागण्या मान्य करण्याची मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)
कामबंद आंदोलनामुळे कामे खोळंबली
By admin | Published: March 29, 2015 2:13 AM