रामदास तडस : अमरावती-हिंगणघाट राज्य मार्गाचे रूंदीकरण सुरू
पुलगाव : राज्यातील लहान-मोठ्या मार्गावर जड वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे तालुक्यातील व वर्धा जिल्ह्यातील राज्यमार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. जड वाहनांचा वाढता व्याप पाहता रस्त्यांची दुरूस्ती गरजेची झाली आहे. तालुक्यातून जाणाऱ्या अमरावती देवळी हिंगणघाट राज्य महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. वाहतुकीची कोंडी ठरलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे कामही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तालुक्यातून हैदराबाद-भोपाळ हा राष्ट्रीय महामार्ग, नागपूर-मुंबई हा द्रुतगती मार्ग व अमरावती देवळी हिंगणघाट ते पुढे अहेरी हा राज्य महामार्ग क्र. २९५ असे लांब पल्ल्याचे मार्ग जातात. यापैकी अमरावती देवळी-वायगाव हिंगणघाट या राज्य महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. परिणामी, या मार्गाने वाहने चालविणे त्रासदायक ठरत आहे. जड वाहन वा बसगाड्यांना अमरावतीकडे जाताना वर्धा येथे येऊन नागपूर-मुंबई द्रुतगती मार्गावर यावे लागते. यामुळे अधिकचा भुर्दंड तर सहन करावा लागतो. शिवाय बराच वेळही खर्ची घालावा लागतो. या सर्व बाबींचा विचार करून तालुका व जिल्ह्यातील रस्त्यांकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. यामुळे अमरावती, पुलगाव, आगरगाव, देवळी, वायगाव, हिंगणघाट या राज्य महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण रस्ते विकास योजनेंतर्गत या मार्गाचे नाचणगाव, आगरगाव, देवळी या १८ किमीचे दोन्ही बाजूस रूंदीकरण सुरू झाले आहे. मार्गाच्या रूंदीकरणामुळे शेकडो बेरोजगारांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात देवळी वायगाव-हिंगणघाट या रस्त्याच्या कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे. पुलगाव-आर्वी या मार्गावरील रेल्वे फाटकामुळे होणारी वाहतुकीची कोंडीही लवकरच सुटणार आहे. या मार्गावर असणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकामही लवकरच सुरू होणार आहे. या मार्गासाठी जमीन संपादन व हस्तांतरणाचे काम पूर्ण होताच पुलाचे काम सुरू होईल. या पुलाकडून नागपूर -मुंबई द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या पंचधारा रस्त्याच्या रूंदीकरण कामास सुरूवात झाली आहे. ते काम लवकरच पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)