महादेव जानकर : वर्धेत क्रीडा संकुलावर ध्वजारोहण वर्धा : चरख्याच्या माध्यमातून महात्मा गांधीनी स्वातंत्र्यपूर्व काळात गरीबांच्या हाताला काम दिले, खादीच्या या धाग्याने देशाला स्वावलंबन आणि स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली. तर विनोबांनी हाती घेतलेल्या भूदान यज्ञाने लाखो हेक्टर जमीन भूमिहिनांना उर्दनिवाहासाठी मिळाली. आज हिच देश सेवेची प्रेरणा घेऊन प्रत्येकाने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी केले. भारतीय प्रजासत्ताकाचा ६७ वा वर्धापन दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण त्यांच्या हस्ते झाले. जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक शेरखाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी, मंगेश जोशी तसेच स्वातंत्र्य संग्राम सैनिक उपस्थित होते. यावेळी ना. महादेव जानकर यांनी सर्व स्वातंत्र्य संग्राम सैनिक आणि शहिदांना अभिवादन केले. गृह विभाग, होमगार्ड, एन.सी.सी.स्काऊट, गाईड पथकांनी पथसंचलन करून उपस्थितांना मानवंदना दिली. तसेच सामान्य रुग्णालयातर्फे तंबाखू नियंत्रणासाठी जनजागृती करणारी उत्तम झाँकी, आपातकालीन वैद्यकीय सेवा, आरोग्य विभागाची विविध योजनाची माहिती देणारा चित्ररथ तसेच गृह विभागाचे सायबर क्राईम, दंगल नियंत्रण, वज्र अशा विविध चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृतीपर संदेश देण्यात आला. यावेळी वर्धेतील विविध विद्यालयाचे विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते. ४४ लाखांचा ध्वजनिधी जमा ४जिल्ह्याने सशस्त्र सेना ध्वजनिधी अंतर्गत ४४ लाख रुपये जमा केले. यामुळे झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना ना. जानकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
देशसेवेची पे्ररणा घेऊन काम करावे
By admin | Published: January 28, 2017 12:53 AM