वर्धा : देवळी एमआयडीसी परिसरातील महालक्ष्मी टीएमटी कंपनीतील कामगाराला कंत्राटदाराने धमकावणी केली. धक्काबुक्की करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली असून पीडित कर्मचाऱ्याने याची तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. कर्मचाऱ्याच्या तक्रारीकडे कंपनीतील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने त्याने तक्रारीतून न्यायाची मागणी केली आहे.देवळी येथील महालक्ष्मी टीएमटी कंपनीत भोजनखेडा येथील गजानन नामदेव दोड हा काही वर्षांपासून कामावर आहे. गजाननवर परिवाराची जबाबदारी असल्याने त्याच्या वेतनावर उदरनिर्वाह होत असतो. सोमवारी झालेल्या घटनेत कंपनीतील बडलिंग क्रमांक चार येथे मेंटेनन्सचे काम सुरू होते. त्यामुळे गजानन हा दुपारी ३ वाजता कॅन्टीनमध्ये जेवणास गेला. जेवण करून परतल्यानंतर बडलिंग चार वर उभे असलेले कंत्राटदार बलदेव चौधरी यांनी गजाननवर हल्लआ केला. त्याच्या अंगावर एकाएकी धावून येत त्याला तू इथे उभा कसा, अशी विचारणा केली. यावर गजानन याने मशीन मेंटेनन्सचे काम सुरू होते. अन्य कर्मचारी नसल्याने मशीन चालविता आली नाही. हेल्पर किंवा आॅपरेटर नसल्याने मी जेवण करायला गेलो, असे कारण सांगितले. यावर चौधरीने काही ऐकुन न घेता गजानन ला मारहाण केली. त्याला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर गजानन ने झालेला प्रकार कंपनी कार्यालयातील अधिकाऱ्यांसह गार्डच्या कानावर घातला. तसेच बलदेव चौधरी याच्या घरी जाऊन वेतनाची मागणी केली. परंतु त्याने वेतन देण्यास नकार दिला. त्याला पुन्हा शिवीगाळ करुन वापस पाठविले. यानंतर गजाननला एकाएकी कामावरून कमी करण्यात आल्याने परिवाराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.एकाएकी कोसळलेल्या या संकटामुळे गजानन दोड याने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देऊन न्यायाची मागणी केली आहे. या प्रकरणाची चौकशी करुन संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली निवेदनाची प्रत कामगार आयुक्त, महालक्ष्मी जनरल मॅनेजर यांच्याकडे सादर केल्या आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
कामगाराला जीवे मारण्याची धमकी
By admin | Published: October 08, 2014 11:31 PM